Hema Malini Shares Dharmendra Health Update: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना एका आठवड्यापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ८९ वर्षांचे धर्मेंद्र रुग्णालयात असल्याने चाहते काळजीत पडले आहेत. धर्मेंद्र व्हेंटिलेटर असल्याचे वृत्त होते, पण ते सनी देओलच्या जवळच्या व्यक्तीने फेटाळून लावले. आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी यांनी पोस्ट केली आहे.
सनी देओल, बॉबी देओलची पत्नी तान्या देओल व हेमा मालिनी धर्मेंद्र यांना भेटायला रुग्णालयात आले आहेत. सलमान खानदेखील धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचला आहे. सर्वांचे रुग्णालयाबाहेरचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना खूप काळजी वाटत होती. आता हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे.
धर्मेंद्र यांचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांनी लिहिलं, “धरमजी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्याबद्दल काळजी आणि प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. त्यांच्यावर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की त्यांच्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करा.”
पाहा पोस्ट
हेमा मालिनींच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. लवकर बरे व्हा सर, ते लवकर बरे होतील आम्ही सर्वजण प्रार्थना करतोय अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
दरम्यान, धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. धर्मेंद्र यांना वृद्धत्वसंबंधित काही समस्या आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धर्मेंद्र मागील काही काळापासून मुंबईत नाही तर खंडाळा येथील फार्महाऊसवर राहत आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौरही त्यांच्याबरोबर राहत आहेत, अशी माहिती बॉबी देओलने दिली होती. आता देओल कुटुंबातील काही जण धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल सनी देओलच्या टीमकडून वेळोवळी अपडेट्स देण्यात येत आहेत.
