परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे या चित्रपटात ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत. परेश यांनी चित्रपटात बाबू भय्याची भूमिका साकारण्यास नकार दिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून या गोष्टीची चर्चा सुरू आहे. परेश रावल व चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत अशा अनेक अफवा ऐकायला मिळत होत्या. त्यानंतर स्वत: परेश यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियावर पोस्ट करीत ते म्हणाले होते, “मी ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचा भाग नाही; पण याचं कारण माझे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासह काही वैचारिक वाद आहेत, असं नाहीये. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.”

अशातच आता ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार आज मंगळवारी (२०/०५/२५) अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांना २५ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे.अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधताना चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी परेश रावल यांच्या चित्रपटात काम न करण्याच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला माहीत नाही की, असं का झालं? कारण- परेशनं याबाबत आम्हाला पूर्वकल्पना दिली नव्हती. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी अक्षय कुमारनं मला सुनील शेट्टी व परेश रावल दोघेही काम करण्यास तयार आहेत का याबाबत एकदा त्यांना पुन्हा विचार, असं सांगितलं होतं आणि तेव्हा दोघांकडूनही सकारात्मक प्रतीसाद आली होती.”

प्रियदर्शन पुढे म्हणाले, “त्यामुळे माझं काहीच नुकसान होत नाहीये; पण अक्षय कुमारनं चित्रपटाच्या निर्मितीत पैसे टाकले होते आणि कदाचित हेच कारण आहे की, त्यानं हे पाऊल उचललं असावं. परेश याबाबत आजपर्यंत माझ्याशी बोलला नाहीये.” अक्षय कुमारनं अद्याप याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे प्रियदर्शन, अक्षय कुमार व परेश रावल यांनी नुकतंच त्यांच्या ‘भूत बंगला’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.

दरम्यान, अनेक दिवसांपासून परेश रावल, प्रियदर्शन, तसेच ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट चर्चेत आहे. परेश रावल यांनी या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चित्रपटाच्या चाहत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. यापूर्वी ‘हेरा फेरी,’ ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं होतं. तर अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांच्या चित्रपटातील पात्रांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोन्ही चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.