Homebound Box Office Collection Day 1: भारताने ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून पाठवलेला ‘होमबाउंड’ हा चित्रपट शुक्रवारी (२६ सप्टेंबर रोजी) जगभरात प्रदर्शित झाला. जान्हवी कपूर, ईशान खट्टर व विशाल जेठवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. ऑस्करसाठी पाठवलेल्या ‘होमबाउंड’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

भारतातील विविध भाषांमधील २४ चित्रपट ऑस्करसाठी शर्यतीत होते. यादीत अभिषेक बच्चनचा ‘आय वाँट टु टॉक’, ‘पुष्पा २’, ‘द बंगाल फाईल्स’ ‘जुगनुमा’, ‘फुले’ यांचा समावेश होता. या यादीत चार मराठी चित्रपटही होते. त्यामध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणारा ‘दशावतार’, ‘स्थळ’, ‘साबर बोंडं’ आणि ‘आता थांबायचं नाय’ यांचा समावेश होता. सर्व २४ चित्रपटांपैकी ‘होमबाउंड’ची निवड करण्यात आली.

नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ने पहिल्या दिवशी देशभरातील बॉक्स ऑफिसवर अर्धा कोटींपेक्षा कमी कमाई केली. ‘होमबाउंड’ला बेस्ट इंटरनॅशनल फीचर कॅटेगरीत भारताकडून अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून निवडण्यात आलं आहे.

होमबाउंडचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, होमबाउंडने भारतात ३० लाख रुपयांची कमाई केली आहे. ही प्रारंभिक आकडेवारी आहे, निर्मात्यांनी अधिकृत आकडेवारी शेअर केल्यावर एकूण कलेक्शन कळेल. होमबाउंडचे ओपनिंग कलेक्शन हे ईशानच्या ‘धडक’ चित्रपटापेक्षा खूपच कमी आहे. धडकने पहिल्या दिवशी ८.७१ कोटी कमावले होते. तर ‘फोन भूत’ चित्रपटाने २.०५ कोटी रुपये कमावले होते. दुसरीकडे विशालच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४५ लाखांची कमाई केली होती.

होमबाउंडची कथा

हा चित्रपट उत्तर भारतातील एका छोट्या गावातील दोन बालपणीच्या मित्रांची कथा सांगतो. हे दोघेही पोलिसाची नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असतात. ही नोकरी त्यांना आदर मिळवून देते.