This Director Praises Late Irrfan Khan : इरफान खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने अनेकांच्या मनावर राज्य केलं, त्यामुळेच आज ते हयात नसतानाही अनेक जण त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल बोलतात. अशातच लोकप्रिय दिग्दर्शक दीपक डोबरीयाल यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं आहे.

‘स्क्रीन’शी संवाद साधताना त्यांनी इरफान खान त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंगातून जात असतानाही कामाला प्राधान्य द्यायचे, असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’बद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “विचार करा, इरफान शेवटच्या चित्रपटाच्यावेळी कोणत्या परिस्थितीतून जात होता; तरीसुद्धा त्याने त्याच्या कामाला, भूमिकेला प्राधान्य दिलं. त्याला खऱ्या आयुष्यात काय सुरू आहे याबद्दल कल्पना होती, पण तरी तो या चित्रपटातील वडील व मुलीचं नातं अजून चांगल्या पद्धतीने कसं खुलेल याबद्दल विचार करायचा.”

इरफान खान यांनी आजारपणातही कामाला दिलेलं प्राधान्य

दीपक पुढे म्हणाले, “तो फक्त अजून कसं चांगल्या पद्धतीने ही भूमिका साकारता येईल, काय वेगळं करता येईल याबद्दल विचार करायचा. कल्पना करा, खऱ्या आयुष्यातील अडचणी, आजारपण विसरून तो फक्त कामाबद्दल विचार करत होता. एक अशी व्यक्ती ज्याला उद्या काय होणार आहे याबद्दल काही माहीत नव्हतं, ती फक्त त्याच्या कामाचा विचार करत होती, त्यामुळे माझ्यासाठी त्याचं ‘अंग्रेजी मीडियम’मधील काम त्याच्या इतर सगळ्या चित्रपटांच्या तुलनेने चांगलं आणि आतापर्यंतचं उत्कृष्ट आहे.

‘अंग्रेजी मीडियम’ मार्च २०२० मध्ये प्रदर्शित झालेला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक महिन्यापूर्वीच इरफान खान यांचं निधन झालेलं. इरफान खान यांना २०१८ मध्ये कर्करोगाचं निदान झाल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. यानंतर ते उपचारांसाठी लंडनला गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात काम केलं; परंतु दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.

दरम्यान, इरफान खान यांनी आजवर अनेक चित्रपटांत भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही अनेक जण त्यांचे चित्रपट आवडीने पाहतात व त्यांच्या कामाचं कौतुक करताना दिसतात.