Jackie Shroff Angry On Paparazzi : बॉलीवूडच्या कलाकारांची एक झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी त्यांच्या मागे-पुढे फिरत असतात. कलाकार जिकडे जातील तिकडे हे पापाराझी त्यांना फॉलो करीत असतात. अनेक कलाकारसुद्धा या पापाराझींना पोजद्वारे फोटो वा व्हिडीओ देत असतात. पण काही वेळेस पापाराझींच्या गोंधळामुळे सेलिब्रिटी त्यांच्यावर चिडताना, ओरडतानादेखील पाहायला मिळतं. असंच काहीसं नुकतंच जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर घडलं.
जॅकी श्रॉफ हे त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांचे पापाराझींबरोबरच्या मजेशीर संवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, त्यांचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जॅकी श्रॉफ हे पापाराझींवर काहीसे चिडलेले आणि नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
बॉलीवूड अभिनेते पंकज धीर यांच्या निधनानंतर आयोजित केल्या गेलेल्या शोकसभेत जॅकी श्रॉफही गेले होते. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी शोकसभेसारख्या संवेदनशील प्रसंगादरम्यान पापाराझींनी सभ्यता आणि सहानुभूती राखण्यासंदर्भात सुनावले. शोकसभेदरम्यान पापाराझीमधील काही फोटोग्राफर्स त्यांच्या अधिक जवळ येत होते, जे जॅकी श्रॉफ यांना अजिबातच आवडलं नाही आणि ते पापाराझीवर चिडले.
Bollywood Societyy या इन्स्टाग्राम पेजद्वारे शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक फोटोग्राफर त्यांच्या अधिक जवळ येत असल्याचे दिसत आहे. त्या फोटोग्राफरला पाहून जॅकी श्रॉफ थांबले आणि त्याच्या जवळ गेले. त्यावर फोटोग्राफर म्हणाला, “भाऊ, मी काहीही करत नाहीये.” मग जॅकी यांनी त्याला समजावत, “तुम्ही समजूतदार आहात ना? जर तुमच्या घरात, माझ्या घरात असं काही घडलं असतं तर? तुम्हाला समजतंय ना?” असं म्हणतात आणि निघून जातात.
दरम्यान, जॅकी श्रॉफ यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल सोशल मीडियावर अनेक जण त्यांचं कौतुक करीत आहेत. “जग्गूदादांनी त्याला खूपच चांगल्या पद्धतीनं समजावलं”, “अशा ठिकाणी पापाराझींबरोबर योग्य तो संयम राखलात” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून नेटकऱ्यांनी जॅकी श्रॉफ यांच्या कृतीचं कौतुक केलंय. तसेच अनेक नेटकरी पापाराझींवर टीकाही करीत आहेत.
जॅकी श्रॉफ पापाराझींवर चिडल्याचा व्हिडीओ
ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं १५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. १७ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये आयोजित शोकसभेदरम्यान पंकज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चित्रपट आणि टीव्ही विश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. धीर कुटुंबीयांना आधार देण्यासाठी ही मंडळी उपस्थित होती. यावेळी जॅकी श्रॉफही धीर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी तेथे गेले होते.
