Javed Akhtar Slams Troll : १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वतंत्रदिनाचा जल्लोष पाहायला मिळाला. यादरम्यान गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी देखील सर्व भारतीयांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधीत एक पोस्ट केली. यावर एका यूजरने कमेंट करत त्यांचा स्वतंत्र्य दिन १४ ऑगस्ट रोजी असतो असे म्हटले. यावर जावेद अख्तर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी या वापरकर्त्याला चांगलेच फटकारत सडेतोड उत्तर दिले. जावेद अख्तर यांनी दिलेल्या या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

जावेद अख्तर यांची पोस्ट काय होती?

जावेद अख्तर यांनी लिहिले होते की, “माझ्या सर्व भारतीय भगिनी आणि बंधूंना स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण हे विसरता कामा नये की हे स्वतंत्र्य आपल्याला ताटात वाढले गेले नाही. आज आपण त्या लोकांना आठवले पाहिजे आणि त्यांना नमन केले पाहिजे ज्यांनी आपल्याला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी तुरुंगात गेले आणि फाशीवर गेले. ही मौल्यवान भेट आपण कधीह गमावणार नाहीत याची काळजी घेऊया.”

यावर गोलमाल नावाच्या एका एक्स वापरकर्त्याने यावर कमेंट केली की, “आपका हॅप्पी इंडिपेंडन्स तो १४ ऑगस्ट है”, म्हणजे हा व्यक्ती जावेद अख्तर यांना पाकिस्तानचा स्वतंत्र्यदिन साजरा करावा असे सूचवत होता. यावर संतापलेल्या जावेद अख्तर यांनी कमेंट करत उत्तर दिले की, “बेटा, जेव्हा तुझे वडील-आजोबा इंग्रजांचे बूट चाटत होते, तेव्हा माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळे पाणी येथे मरत होते. तुझ्या मर्यादेत राहा. (बेटा जब तुम्हारे बाप दादा अंग्रेज के जूते चाट रहे थे, मेरे बुजुर्ग देश की आजादी के लिए काला पानी में मर रहे थे। अपनी औकात में रहो।)”

हेही वाचा

अंदमान बेटावरील सेल्युलर जेलला काळे पाणी असे म्हटले जाते, येथे इंग्रजांकडून स्वातंत्र्य सैनिकांना कठोर कारावासात ठेवले जात असे. जावेद अख्तर यांचे पंजोबा फाजल-ए-खैराबादी फजल-ए-हक खैराबादी (१७९७-१८६१) हे इस्लामिक स्कॉलर, कवी आणि स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला. तसेच त्यांनी फतव्याद्वारे १८५७ च्या बंडाला पाठिंबा दिला होता. ज्यामुळे त्यांना अंदमान बेटांवर पाठवण्यात आले, येथेच त्यांचे निधन झाले. इतकेच नाही तर जावेद अख्तर यांचे आजोबा मुझ्तर खैराबादी आणि त्यांचे वडील जान निसार अख्तर हे देखील स्वतंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.