Kabir Bedi and his daughter were estranged: ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी ‘किस्मत’, ‘आतंक ही आतंक’, ‘नागिन’, ‘ये आग कब बुझेगी’, ‘सलामी’, ‘क्रांती’ अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखले जातात. अनेकदा मुलाखतींमधील त्यांच्या वक्तव्यांची चर्चादेखील होताना दिसते. ते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी सांगतात.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबीर बेदींनी त्यांचा त्यांच्या मुलीबरोबर काही वर्षे अबोला होता, असे वक्तव्य केले आहे. तसेच, त्याचे कारण काय होते, याचाही खुलासा त्यांनी केला आहे. बाप-लेकीच्या नात्यात मालमत्तेमुळे दुरावा आल्याचे म्हटले जात होते.

“दोन-तीन वर्षे आम्ही…”

कबीर बेदी यांनी सिद्धार्ध कननच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “प्रत्येक नात्यात कधी ना कधी अडचणी निर्माण होतात. मला ती कारणं परत सांगायची नाहीत. पण, आमच्यात काही गैरसमज निर्माण झाले होते. तिने अशा काही गोष्टी केल्या की, ज्यामुळे मी तिच्यावर नाराज होतो. मग मी काही अशा गोष्टी केल्या, ज्यामुळे ती नाराज झाली. दोन-तीन वर्षे आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. कारण- आमच्यात मतभेद होते. आता ते मतभेद, गैरसमज दूर झाले आहेत.

कबीर बेदी पुढे म्हणाले, “आमचं नातं आता घट्ट होत आहे. वडील आणि मुलीचं चांगलं नातं आहे आणि ती करत असलेल्या सर्व गोष्टींचा मला खूप अभिमान आहे. आमच्यात खूप प्रेम आणि आदर आहे.”

पूजा ही प्रोतिमा व कबीर बेदी यांची मुलगी आहे. कबीर बेदी व प्रोतिमा यांनी १९६९ साली लग्न केले होते. ते १९७४ ला वेगळे झाले. १९७७ ला त्यांनी घटस्फोट घेतला. २०१६ साली कबीर बेदींनी परवीन दुसांज यांच्याशी लग्न केले आहे.

याच मुलाखतीत त्यांना असेही विचारले गेले की, परवीन यांच्याबरोबरच्या लग्नामुळे बाप-मुलीच्या नात्यात दुरावा आला होता का? त्यावर कबीर बेदी म्हणाले, “कारण काहीही असो. आपण त्यामध्ये नको जाऊयात. आमच्या नात्यात दुरावा येण्यामागे फक्त परवीनच जबाबदार नव्हती. इतरही काही कारणे होती, ज्यामुळे आम्ही वेगळे झालो. एक वडील आणि मुलीच्या नात्यात काही गैरसमज झाले होते, ज्याच्या परवीनशी काहीही संबंध नव्हता. आनंदाची गोष्ट ही आहे की, आता सर्व काही सुरळीत झालं आहे. माझं पूजावर खूप प्रेम आहे. माझं परवीनवरही खूप प्रेम आहे. त्या दोघी एकाच शहरात राहतात. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची भेट होत असते. आता सगळं काही ठीक आहे.”

दरम्यान, परवीन दुसांज आणि प्रोतिमा यांच्याशिवाय कबीर बेदींनी निक्की बेदीबरोबरही लग्न केले होते. त्यांनी १९९२ ला लग्नगाठ बांधली होती; मात्र २००५ ते वेगळे झाले. त्याबरोबरच परवीन बाबींबरोबरच्या त्यांच्या नात्याची आजही चर्चा होताना दिसते.