This Actress Reacts To Fake Accident Reports : सोशल मीडियावर अनेकदा कलाकारांबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात. काहीवेळा त्यांच्याबद्दल चुकीच्या अफवाही पसरवल्या जातात. असंच काहीसं लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर घडलं. सोशल मीडियावर तिच्याबद्दल खोटी अफवा पसरवण्यात आल्यानंतर तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटांत काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवालबद्दल तिचा अपघात झाला असल्याची खोटी अफवा पसरवण्यात आली. आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया देत ही अफवा खोटी असल्याचं म्हटलं आहे. यावेळी तिने संताप व्यक्त केला आहे.
‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार सोशल मीडियावर अनधिकृत अकाउंटवरून काजलचा अपघात झाल्यासंदर्भात पोस्ट करण्यात आलेली. यामध्ये तिचा अपघात झाला असून तिला गंभीर दुखापत झाल्याचं म्हटलं गेलं, यामुळे तिच्या जवळच्या लोकांना व चाहत्यांना अभिनेत्रीबद्दल काळजी वाटत होती. काहींनी तिच्यासाठी प्रार्थना करत पोस्ट केल्या होत्या.
काजल अग्रवालने आता ही अफवा खोटी ठरवली असून तिने शेअर केलेल्या पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे. काजल अग्रवालने तिच्या अपघाताच्या खोट्या अफवा पसरवल्या गेल्यानंतर इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व अशा अफवा पसरवू नये अशी विनंतीही केली आहे. ती म्हणाली, “माझा अपघात झाला आहे आणि आता मी या जगात नाही वगैरे अशी एक बातमी मी पाहिली. ती खोटी बातमी आहे. देवाच्या कृपेने मी सुखरुप आहे. मला सांगायला आवडेल की मला काहीही झालेलं नाही, मी सुखरुप आहे आणि माझं सगळं छान सुरू आहे. मी विनंती करते की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशा खोट्या बातम्या पसरवू नका.”
काजल अग्रवाल ही हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. काजलने आतापर्यंत ‘विरा’, ‘डार्लिंग’, ‘सिंघम’, ‘ब्रदर्स’, ‘द सुपर खिलाडी’, ‘सेथा’, ‘एम.एल.ए’, ‘ऑल इज गुड’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. अलीकडेच ती सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात झळकलेली. यामध्ये तिच्यासह रश्मिका मंदानाही पाहायला मिळालेली.