Kajol Recalled Her Debut Film Experience : काजोल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिनं अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तिने वयाच्या १६ व्या वर्षीच काम करायला सुरुवात केलेली. तिनं ‘बेखुदी’ या चित्रपटातून १६ व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता काजोलनं नुकताच या चित्रपटाच्या सेटवरील अनुभव सांगितला आहे.
काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं ‘बेखुदी’ चित्रपटातील एका सीनदरम्यानचा प्रसंग सांगितला आहे. तिला तो सीन करणं कठीण जात होता. पण, शेवटी चित्रपटासाठी अभिनेत्रीला तो सीन करावाच लागला, असं तिनं नुकतंच ‘ब्रूट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
१९९२ साली आलेल्या ‘बेखुदी’ चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केलं होतं. या चित्रपटात काजोलबरोबर तिच्या आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजाही झळकल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटात दोघींनी ऑनस्क्रीनसुद्धा माय-लेकींची भूमिका साकारलेली. तर, या दोघींव्यतिरिक्त चित्रपटात अभिनेते कमल सदाना, फरीदा जलाल, विजयेंद्र घाटगे या कलाकारांनीही भूमिका साकारल्या होत्या.
सीनसाठी कोणालातरी कानाखाली मारणं माझ्या तत्तवांच्या विरोधात – काजोल
काजोलनं या मुलाखतीत कमल यांच्याबरोबर एक सीन करतानाचा अनुभव सांगितला आहे. ‘बेखुदी’ चित्रपटात असा एक सीन होता, जिथे काजोलला कमल याच्या कानाखाली मारायची होती. परंतु, तिच्यासाठी हा सीन करणं कठीण गेलं असल्याचं तिनं म्हटलं आहे. ती म्हणाली, “कोणाला तरी एका सीनसाठी त्यांची काहीही चूक नसताना कानाखाली मारणं माझ्यासाठी फार अवघड गोष्ट होती. मी तो सीन करण्याचा प्रयत्न करीत होते; पण ते माझ्याकडून होतच नव्हतं. त्याच्यावर हात उचलणं मला जमत नव्हतं.”
काजोल पुढे म्हणाली, “हे माझ्या तत्त्वांच्या विरोधात होतं. मला कमल आवडायचा. तो खूप छान होता. माझ्याशी तो खूप चांगलं बोलायचा. तो एक उत्तम माणूस आहे. त्याच्याबरोबर काम करताना मला मजा आली. त्यामुळे मी त्याला कानाखाली का मारू?”.
कमल यांच्याबरोबर तो सीन करतानाचा अनुभव सांगत काजोल पुढे म्हणाली, “आमचे दिग्दर्शक म्हणाले, मला असं वाटतं की, तुला त्याला कानाखाली मारायची आहे. तुला त्याला शिक्षा करायची आहे आणि त्यामुळे तू सारखं सारखं रिटेक घेत आहेस. तू त्याला कुठल्या तरी गोष्टीसाठी शिक्षा देत आहेस.” काजोलनं पुढे सांगितलं की, दिग्दर्शकाचं हे बोलणं ऐकून तिचा राग अनावर झाला होता.
चित्रपटाच्या सेटवर ढसाढसा रडलेली काजोल
काजोल पुढे म्हणाली, “त्यानंतर मी म्हटलं की, आता तुम्ही फक्त बघाच आणि त्यानंतर मग मी एक चांगला टेक दिला; पण त्यामुळे मी ढसाढसा रडले. मी कमलची माफी मागितली. मी त्याला म्हटलं, मला माफ कर. कारण- त्याचा मलाच खूप त्रास झालेला. माझ्या मनात मी एका चांगल्या व्यक्तीबरोबर खूप चुकीचं केलं आहे, अशी भावना निर्माण झालेली.”
अभिनेत्री त्याबद्दल पुढे म्हणाली, “आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी कॅमेऱ्यासमोर उभं राहून किमान ३० लोकांसमोर हसावं, रडावं आणि विचित्र गोष्टी म्हणाव्या, जेणेकरून आपल्याला कळतं की, सगळ्यांनाच तेवढा फरक पडत नाही. त्यामुळे शेवटी तुम्ही स्वत:कडे कसं बघता यावर सगळं अवलंबून असतं.”