अभिनय, दिग्दर्शन व राजकीय अशा विविध क्षेत्रांत कंगना रनौत यांनी कामं केली आहेत. कंगना रनौत आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना कायम काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर त्या आपलं परखड मत व्यक्त करीत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर कायम त्यांची चर्चा होताना दिसते. आता कंगना यांनी आणखी एका वेगळ्या क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत त्यांनी याची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगना रनौत यांनी हॉटेल व्यवसायात आपलं नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशात ‘द माउंटन स्टोरी’बरोबर या व्यवसायात आपलं पहिलं पाऊल ठेवलं आहे. येथे येणाऱ्या व्यक्तींना हिमाचल प्रदेशमधील विविध पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

कंगना यांनी ‘द माउंटन स्टोरी’ कॅफे आणि रेस्टॉरंटची एक झलक दाखविणारा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला कंगना बर्फाने झाकलेल्या डोंगराळ भागातून आणि मेंढ्यांच्या कळपातून हॉटेलमध्ये प्रवेश करीत आहेत. आतमध्ये आल्यावर दोन कर्मचारी त्यांचे स्वागत करतात. आतमध्ये बाहेरील बर्फाच्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी शेकोटी लावण्यात आली आहे. तसेच येथील बसण्याचे टेबल आणि खुर्ची व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यानंतर तेथील काही स्थानिक व्यक्ती हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आल्याचे दिसते. त्यांच्यासमोर हिमालयातील विविध पारंपरिक पदार्थांची थाळी ठेवली जाते. शेवटी कंगना तेथील टेबल स्वत: आवरताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये कंगना यांनी म्हटलं आहे, “कॅफे आणि रेस्टॉरंट ‘द माउंटन स्टोरी’ची सुरुवात बालपणीच्या आठवणी आणि आईने बनविलेल्या पदार्थांचा सुगंध यांना प्रेरित होऊन केली आहे.” तसेच कंगना यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “माझं बालपणीचं स्वप्न सत्यात उतरलं, हिमालयाच्या खुशीत माझं छोटंसं कॅफे- द माउंटन स्टोरी, ही एक प्रेमकथा आहे.”

‘या’ तारखेपासून होणार सुरू

कंगना यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांचं ‘द माउंटन स्टोरी’ कॅफे आणि रेस्टॉरंट केव्हा सुरू होणार याची तारीखही सांगितली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने हे कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू होत आहे. “कॅफे आणि रेस्टॉरंट ‘द माउंटन स्टोरी’ १४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे”, असं त्यांनी लिहिलं आहे.

कंगना यांनी या कॅफे आणि रेस्टॉरंटचे अन्य काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत ‘द माउंटन स्टोरी’ कॅफे आणि रेस्टॉरंटचा गेट दिसत आहे. त्यावर कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “पर्वत शिखर ही अशी जागा आहे, जिथे जीवनाला स्वातंत्र्याचा शुद्ध अर्थ सापडतो.” कंगना यांचं निसर्गावर फार जास्त प्रेम आहे. त्यांनी आणखी एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, “पर्वत माझी हाडे आहेत, नद्या माझ्या शिरा आहेत, जंगले माझे विचार आहेत आणि तारे माझी स्वप्ने आहेत.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut open new cafe and restaurant the mountain story in himalayas starting from valentine day rsj