स्टारडमचा अर्थ केवळ प्रेक्षकांसाठीच नाही तर अभिनेत्यांसाठीही बदलत आहे. जर एखादा कलाकार प्रतिभावान असेल आणि त्याच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांशी जोडला गेला असेल तर स्टारडम आपोआप येईल, असा विश्वास करीना कपूर खानला आहे. यावेळी तिने सिक्स-पॅक अॅब्स दाखवणाऱ्या अभिनेत्यांनाही टोला लगावला.
‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “जर तुम्ही चांगले, प्रतिभावान असाल आणि लोकांना तुम्ही आवडत असाल, लोक तुमच्याशी जोडले जात असतील तर स्टारडम येणारच. ‘अरे त्याचे सिक्स-पॅक अॅब्स आहेत, तो खूप हॉट दिसत आहे, तो एक मोठा स्टार आहे,’ असं नसतं. कधीकधी मला त्या कलाकारांना सांगावंसं वाटतं, ‘अरे प्लीज यार! आधी तुमचा टी-शर्ट घाला. मी तुमच्याकडे पाहूही शकत नाही.”
आजोबा राज कपूर, काका ऋषी कपूर आणि वडील रणधीर कपूर इंडस्ट्रीत सक्रियपणे काम करत होते तेव्हापासून काळ बदलला आहे असं करीनाने नमूद केलं. “आता जर तुम्ही एक चांगले कलाकार असाल, तर तुम्ही खूप काळ टिकून राहाल,” असं मत करीनाने मांडलं.
करीना नुकतीच नेटफ्लिक्सवरील ‘जाने जान’ चित्रपटात झळकली होती. यात तिच्याबरोबर विजय वर्मा व जयदीप अहलावत यांच्याही भूमिका होत्या. करीनाने माया नावाचे पात्र साकारले होते. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं, पण अनेकांनी करीनाला हा चित्रपट करू नये असा सल्ला दिला होता. “जाने जान पाहिल्यावर ‘अरे तू अशी डार्क फिल्म का केलीस?’ असं लोक मला म्हणत होते,” असा खुलासा कंगनाने केला.
करीना पुढे हंसल मेहता यांच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’मध्ये एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. यात अॅश टंडन, रणवीर ब्रार आणि कीथ अॅलन यांच्याही भूमिका आहेत. तसेच ती रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’मध्येही झळकणार आहे.