Kareena Kapoor on Saif Ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गेल्या वर्षी १६ डिसेंबर, २०२४ च्या मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. मुंबईतील राहत्या घरी अभिनेत्यावर अज्ञात व्यक्तीकडून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. सैफवरील या हल्ल्यामुळे बॉलीवूड विश्वासह अवघा देश हादरला होता. या हल्ल्यात सैफच्या पाठीत शस्त्र रुतलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रियाही झाली होती.
या घटनेनंतर कपूर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. तसेच यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि ते वातावरण अजूनही आहे, असं नुकतंच करीनानं एका मुलाखतीत सांगितलं. बरखा दत्तला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, करीनानं या घटनेबद्दलची सविस्तर माहिती दिली. तसेच या हल्ल्याचा तिच्या लहान मुलांवर कसा परिणाम झाला? याबद्दलही करीनानं तिच्या भावना व्यक्त केल्या.
त्याबद्दल करीना म्हणाली, “तुमच्या मुलाच्या खोलीत मध्यरात्री कोणीतरी दिसलं, तर काय होऊ शकतं, या विचारानं आजही मला भीती वाटते. मुंबईत तुम्हाला अशा घटना कधीच ऐकायला मिळत नाहीत. मुंबईत आम्ही कधीही कोणीतरी घरात घुसून पतीवर हल्ला केल्याचं ऐकलेलं नाही. अमेरिकेत हे खूप सामान्य आहे. त्यामुळे आम्ही अजूनही त्या परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न करीत आहे. या घटनेनंतर काही दिवस मी खूप चिंताग्रस्त होते. अजूनही आहे.”
करीना कपूर इन्स्टाग्राम पोस्ट
या घटनेनंतर करीनाला तैमूर व जेहसाठी खंबीर राहावं लागलं. त्याबद्दल ती म्हणाली, “मला माझ्या मुलांसाठी कायम भीतीयुक्त वातावरणात जगायचं नव्हतं. कारण- या घटनेचा मुलांवर ताण टाकणंदेखील चुकीचं आहे. त्यामुळे या घटनेनंतर माझा एक आई आणि एक पत्नी, असा कठीण प्रवास सुरू होता. पण, मी आनंदी आहे आणि कायमच देवाचे आभार मानते की, आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही एक कुटुंब म्हणून खंबीर राहिलो.”
पुढे करीना म्हणाली, “माझा धाकटा मुलगा (जेह) अजूनही म्हणतो की, माझे वडील बॅटमॅन आणि आयर्न मॅन आहेत. ते कोणाचाही सामना करू शकतात. पण, या हल्ल्यानंतर माझ्या मुलांना त्यांच्या इतक्या सुरक्षित आयुष्यातही अशा घटनांना सामोरं जावं लागू शकतं ही जाणीव निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना वास्तवाचं भान आलं आहे. कारण- त्यांनी वयाच्या चौथ्या आणि आठव्या वर्षात रक्त पाहिलं आहे.”
पुढे करीना म्हणाली, “माझ्या मुलांनी त्यांच्या आयुष्याच्या इतक्या लहान वयात रक्त पाहायला नको होतं; पण आता हे घडलं आहे. या घटनेनंतर मला जाणवलं की, या काही आठवणी हळूहळू पुसल्या जातील; पण तरीही अशी एखादी घटना ही मृत्यूसमान आहे. जेव्हा तुम्ही आयुष्यातील एखाद्याला गमावता, तेव्हा तुम्ही त्यातून पूर्णपणे कधीच सावरत नाही. मी हे अनुभवलं आहे की, तुम्ही खरोखर त्यातून कधीच बाहेर पडत नाही. परंतु, त्याबद्दलच्या अनेक आठवणी तुम्ही हळूहळू विसरत जाता.”