Chhaava: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट ४ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक व प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. याचदरम्यान, बॉलीवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्याच्या पोस्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकिपिडीयाला मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केआरकेने सोमवारी, १७ फेब्रुवारीला केलेल्या एक्सवरील एका पोस्टमध्ये विकिपीडियावरील माहितीचा आधार घेतला होता. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या व आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. ‘छावा’च्या प्रदर्शनानंतर केआरकेने केलेली ही वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती हटवण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त गोष्टींचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारने सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी विकिपीडियाशी बोलून संभाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त माहिती हटवून योग्य माहिती प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत.” सर्व खोट्या गोष्टी हटवून योग्य माहिती देण्यात यावी, असे आदेश दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

“मी सायबरच्या आयजींना विकिपीडियावरील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल माहिती दिली आहे. त्यांना विकिपीडियाशी संपर्क साधून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विकिपीडिया भारतातून चालवले जात नाही. त्यांचे स्वतःचे काही नियम आहेत. त्यामुळे ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करण्याऐवजी त्यासंदर्भात काही नियम तयार करा, असा सल्ला त्यांना देऊ शकतो,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे कलाकार आहेत. हा चित्रपट सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. विकिपीडिया हे माहितीचे स्रोत म्हणून वापरले जाणारे व्यासपीठ आहे. विकिपीडियाने छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा वादग्रस्त मजकूर हटवला नाही तर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk controversial post about chhatrapati sambhaji maharaj cm devendra fadnavis reacts amid chhaava release hrc