Shahid Kapoor and Priyanka Chopra’s alleged Relationship: प्रियांका चोप्रा व शाहिद कपूर सध्या दोघेही बॉलीवूडचे यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जातात. आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्येही सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

या दोन्ही लोकप्रिय कलाकारांनी ‘कमिने’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर चित्रपट निर्माता व दिग्दर्शक कुणाल कोहलीने त्यांना २०१२ साली प्रदर्शित झालेल्या तेरी मेरी कहानी या चित्रपटात कास्ट केले होते. त्यावेळी ते दोघे एकमेकांना डेट करीत असल्याचे म्हटले जात होते. आता कुणाल कोहलीने एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे.

“ते एकमेकांशी बोलत…”

कुणाल कोहलीने नुकताच फरीदून शहरयार यांच्याशी संवाद साधला. जे कलाकार नात्यात असतात, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा असतो, असा प्रश्न त्यावेळी कुणालला विचारला गेला.

त्या प्रश्नाचे उत्तर देताना कुणाल कोहली म्हणाला, “रिलेशनशिपमध्ये असलेले कलाकार जर एकाच चित्रपट काम करीत असतील, तर त्यांच्याबरोबर काम करणं ही मजेची गोष्ट नसते. कारण- काही वेळा त्यांची भांडणं झालेली असतात. ते एकमेकांशी बोलत नसतात. अशा वेळी दिग्दर्शकाला काळजी घ्यावी लागते. पण, प्रियाकांबरोबर काम करताना ही चिंता असत नाही. कारण- ती कामाप्रति समर्पित आहे. ती खासगी व व्यावसायिक गोष्टी एकमेकांपासून अलिप्त ठेवते. ती खूप चांगली व्यक्ती आहे. ती दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन यासाठी उत्तम आहे.”

“जेव्हा तुम्हाला सेटवर काहीतरी चुकीचं घडत आहे, असं वाटतं. तेव्हा तिच्याकडे पाहिलं, तर ती ठीक असते. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा तिच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्हालादेखील आत्मविश्वास येतो. ती काम करण्यासाठी सर्वोत्तम लोकांपैकी एक आहे. मी माझ्या आयुष्यात पुन्हा लवकरच तिच्याबरोबर काम करीन, अशी आशा आहे,” असे प्रतिक्रिया कुणालने दिली.

जर कलाकार रिलेशनशिपमध्ये असतील, तर त्याचा पडद्यावर दिसणाऱ्या केमिस्ट्रीसाठी काही उपयोग होतो का? त्यावर कुणाल कोहली म्हणाला, “खऱ्या आयुष्यातील रोमान्सचा पडद्यावर दिसणाऱ्या केमिस्ट्रीसाठी काही उपयोग होत नाही. चांगली केमिस्ट्री दिसण्यासाठी कलाकार चांगले पाहिजेत आणि स्क्रिप्टदेखील तितकीच चांगली पाहिजे.”

‘तेरी मेरी कहानी’ या चित्रपटाबद्दल बोलायचे, तर या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. तसेच बॉक्स ऑफिसवरदेखील तो चित्रपट हिट ठरला होता. शाहिद कपूर व प्रियांका चोप्राच्या नात्याबद्दल बोलायचे, तर त्यांनी कधीही ते रिलेशनशिपमध्ये आहेत, असे वक्तव्य केले नाही किंवा त्यांच्या नात्याच्या चर्चाही त्यांनी नाकारल्या नाहीत.