This Bollywood Actress’s Journey Is Very Difficult : कलाकार पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांसमोर येत असतात. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत ते प्रेक्षकांची मनं जिंकतात. पण, पडद्यावर ग्लॅमरस दिसणाऱ्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात काय सुरू असतं याची खबर प्रेक्षकांना नसते. आता सोशल मीडियामुळे जरी ते त्यांच्यापर्यंत पोहचत असलं तरी पूर्वी तसं नव्हतं. बॉलीवूडमध्येसुद्धा अशीच एक अभिनेत्री आहे, जिचा खऱ्या आयुष्यातील प्रवास खूप खडतर आहे.

‘आखिरी गोली’, ‘एक महल हो सपनो का’, ‘अपने रंग हजार’, ‘बिदाई’ यांसारख्या चित्रपटांतून काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे लीना चंदावरकर. लीना चंदावरकर या ९० च्या काळातील बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. खासगी जीवनात त्यांनी अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला. परंतु, तरीसुद्धा हार न मानता त्यांनी आयुष्य जगण्याची उमेद सोडली नाही.

लीना चंदावरकर यांनी बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांसह केलेलं काम

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार लीना चंदावरकर यांचा जन्म कर्नाटकातील सैनिकी कुटुंबात झाला होता. १९६८ मध्ये त्यांनी ‘मा का मीत’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये त्यांच्यासह दिवंगत अभिनेते विनोद खन्ना झळकले होते. या चित्रपटामुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या. त्यानंतर त्यांनी राजेश खन्ना, दिलीप कुमार यांसारख्या त्या काळच्या अनेक लोकप्रिय नायकांसह काम केलं होतं.

लग्नानंतर अवघ्या ११ दिवसांतच झालं पतीचं निधन

लीना चंदावरकर यांनी यशाच्या शिखरावर असताना त्यांनी बांदोडकर यांच्याशी लग्न केलं होतं. सिद्धार्थ हे गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र होते. परंतु, नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही म्हणतात तसंच काहीसं लीना यांच्याबाबतीत झालं आणि लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांनंतर त्यांच्या पतीचं निधन झालं. सिद्धार्थ यांच्यासह लग्न केलं तेव्हा लीना फक्त २४ वर्षांच्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या त्यांच्या आईकडे परतल्या. लग्नाच्या काही दिवसांतच पतीचं निधन झाल्याने अनेकजण त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असत, कोणी त्यांना कमनशिबी म्हणत असे.

लीना चंदावरकर यांनी लोकप्रिय गायक किशोर कुमार यांच्यासह केलेला पुनर्विवाह

खासगी आयुष्यात मोठी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी बैराग (Bairaag) चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं. परंतु, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फार यश मिळालं नाही. त्यावेळी त्यांचे लोकप्रिय गायक किशोर कुमार यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले होते. किशोर कुमार लीना यांच्यापेक्षा वयाने २० वर्षांनी मोठे होते. लीना यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांचं तीन वेळा लग्नं झाली होती, त्यामुळे दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता; परंतु तरीसुद्धा या दोघांनी लग्न केलं.

किशोर कुमार व लीना यांच्या लग्नात अनेक आव्हानं आल्याचं म्हटलं जातं. त्यांना एक मुलगासुद्धा आहे. पण पुन्हा एकदा लीना यांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. किशोर कुमार यांचं निधन झालं होतं. किशोर कुमार यांच्या निधनानंतर त्यांनी एकटीनेच त्यांच्या मुलाचा सांभाळ केला. आयुष्यात आलेल्या संकटांसमोर न डगमगता त्यांनी खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला.