काही कलाकारांना पदार्पणाच्या चित्रपटातून इतकं यश मिळतं की त्यांना मागे वळून पाहावं लागत नाही. पण काहींचा मात्र पहिला चित्रपट फ्लॉप झाला की त्यांच्या करिअरची दिशा भरकटते. पुन्हा काम मिळवण्यासाठी तोच संघर्ष आणि धडपड करावी लागते. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने सात वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. नंतर एकवेळ अशी आली की ती फिल्म इंडस्ट्रीपासून दुरावली.

सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्माने ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात आयुषबरोबर अभिनेत्री वारिना हुसेन देखील मुख्य भूमिकेत होती. वारिनाने याच चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वारिना हुसेन बराच काळ लाइमलाइटपासून दूर होती. इतकेच नाही तर ती सोशल मीडियापासूनही दूर होती आणि आता सुमारे ८ महिन्यांनंतर वारिना सोशल मीडियावर परतली आहे. तसेच तिने तिचे नावही बदलले आहे.

वारिनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे, ज्यात तिने तिचं नाव अधिकृतपणे बदलल्याची माहिती दिली आहे. “मी अधिकृतपणे माझं नाव बदलून हिरा वारिना असं ठेवलं आहे. अंकशास्त्रानुसार मी हा निर्णय घेतला आहे. आयुष्याचा नवा अध्याय. या काळात जे माझ्या जवळ राहिलेत, तुमचे प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे,” अशी पोस्ट वारिना हुसेनने इन्स्टाग्रामवर केली आहे.

पाहा पोस्ट

हिरा वारिनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला आयुष्यातील या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सुंदर नाव’, ‘तू काहीही नाव ठेवलंस तरी नेहमीच माझी आवडती अभिनेत्री राहशील’, ‘नवीन प्रवासासाठी तुला खूप शुभेच्छा’, अशा कमेंट्स तिच्या पोस्टवर आहेत.

नाव बदलण्याची पोस्ट करण्यापूर्वी, वारिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर “आज माझं नामकरण होत आहे आणि मी गंमत करत नाहीये,” असं लिहिलं होतं.

वारिना हुसेनची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

हिरा वारिनाबद्दल बोलायचं झाल्यास तिचा जन्म १९९९ मध्ये झाला. ती बराच काळ अफगाणिस्तानात राहिली आणि त्यानंतर अमेरिकेत राहिली. काही काळ अमेरिकेत राहिल्यानंतर ती पुन्हा भारतात परतली आहे. तिने ‘लवयात्री’ नंतर, ‘दबंग ३’ आणि ‘मुन्ना बदनाम हुआ’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर ती बादशाहच्या ‘शी मूव्ह इट लाईक’ या गाण्यात झळकली होती. मग ती सोशल मीडिया व इंडस्ट्रीपासून दूर गेली, पण आता नाव बदलून ती पुन्हा नवी सुरुवात करत आहे.