लकी अली हे बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक आहेत. त्यांचे वडील, दिवंगत दिग्गज अभिनेते मेहमूद, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे स्टार होते. कौटुंबिक पार्श्वभूमी चित्रपटांची असूनही लकी यांनी अभिनय नव्हे तर गायनात करिअर केलं आणि एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचं ‘ओ सनम’ हे गाणं खूपच लोकप्रिय आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक उत्तम गाणी गायली.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना लकी अली यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी त्यांचे वडील मेहमूद यांच्या अनेक आठवणी, त्यांचे किस्से शेअर केले. वडील खूप कडक स्वभावाचे होते, असंही त्यांनी नमूद केलं.
वडील दिग्गज अभिनेते होते, त्यांच्याबरोबर लहानाचे मोठे झालात, तो अनुभव कसा होता? असं विचारल्यावर आपण त्यांच्याबरोबर फार काळ न राहिल्याचं लकी अली यांनी नमूद केलं. “माझ्या वडिलांनी मला बालपणीच बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं. त्यांनी मला इंडस्ट्री व लोकांपासून दूर ठेवलं. माझं त्यांच्याशी बोलणं सुट्टीत घरी आल्यावरच व्हायचं. मी जवळपास दीड महिन्यांसाठी घरी यायचो, तेव्हा त्यांच्याबरोबर शूटिंगला जायचो,” असं लकी अली म्हणाले.
वर्षभरात आम्ही फक्त दीड महिना एकत्र असायचो. याच काळात मी त्यांना भेटायला सेटवर जायचो. आईबरोबर वेळ घालवायचो. माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता, त्यामुळे दोघांबरोबरही वेळ घालवायचो, असं लकी अली यांनी नमूद केलं.
संध्याकाळी ६ नंतर बाहेर जायची परवानगी नव्हती
मेहमूद घरीही गंमत करायचे का? असं लकी अली यांना विचारण्यात आलं. “ते घरी खूप गंमत करायचे, पण ते खूप कडक वडील होते. मी २१ वर्षांचा होईपर्यंत कधीही डेटवर गेलो नाही आणि सर्वांची घरी यायची वेळ संध्याकाळी ६ वाजताची होती; त्यानंतर कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हतं,” असं लकी अली म्हणाले.
मेहमूद मागायचे ५ रुपयांचा हिशोब
लकी अलींनी या मुलाखतीत पुढे सांगितलं की त्यांच्या वडिलांकडे २७ गाड्या होत्या, पण ते त्यांना एकही गाडी वापरू द्यायचे नाहीत. त्यांना त्या चालवण्याची परवानगी नव्हती. “त्यांच्याकडे एक कॉर्व्हेट कार होती, जी मला चालवायची होती पण ते म्हणायचे, ‘जेव्हा तू स्वतः पैसे कमावशील तेव्हा ती विकत घे.’ ते मला सकाळी ५ रुपये द्यायचे आणि संध्याकाळी त्या पैशांचा हिशोब मागायचे. मला बसने प्रवास करावा लागायचा,” असं लकी म्हणाले.