Madhuri Dixit : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता पुढचे काही दिवस अमेरिका दौऱ्यावर असणार आहे. नुकतीच अभिनेत्रीने न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटला भेट दिली. याचा खास व्हिडीओ तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
माधुरी व तिचे सगळे कुटुंबीय मिळून प्रसिद्ध शेफ विकास खन्नाच्या मॅनहॅटन येथील ‘Bungalow’ रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यावेळी रेस्टॉरंटमधील सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून माधुरीचं खूपच प्रेमाने आदरातिथ्य केलं.
डॉ. नेने म्हणतात, “विकास खन्ना ग्रुपच्या Bungalow रेस्टॉरंटला भेट देण्याचा योग आला. खरंच, या सुंदर ठिकाणी जाऊन आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. विशेष म्हणजे या ठिकाणी लंच किंवा डिनरला जायचं असेल तर जवळपास ४ ते ६ महिने आधीच टेबल बुकींग करावं लागतं. आम्हाला ही संधी मिळाली यासाठी त्याचे मी मनापासून आभार मानतो. या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा खूप प्रेमाने पाहुणचार केला जातो. विकास खन्ना हा माझा फक्त मित्र नाहीतर आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे आणि मला माझ्या भावासारखा आहे. त्याने बनवलेले सगळे पदार्थ फारच सुंदर होते. शाब्बास शेफ! आमच्या आयुष्यातील सुंदर संध्याकाळ होती.”
माधुरी दीक्षितला रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यावर वेलकम कॉफी देण्यात आली होती. या कॉफीवर माधुरी अन् तिच्या दिवगंत आई स्नेहलता यांचा फोटो होता. या कॉफी कपची झलक डॉ. नेने यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेत्रीने या रेस्टॉरंटमध्ये तिच्या चाहतीसह डान्स देखील केला आहे.
शेफ विकास खन्नाच्या रेस्टॉरंटमध्ये नेने कुटुंबीयांनी बरेच नवनवीन पदार्थ ट्राय केले. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ पाहून सुपरस्टार माधुरीच्या सरळ-साध्या स्वभावाचं कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर तिने गेल्यावर्षी ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. आता माधुरी लवकरच ‘मिसेस देशपांडे’ या सायकोलॉजिकल थ्रिलर प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. अद्याप या सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.
