Mahesh Bhatt Talks About Tantrik : महेश भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माते आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. परंतु, करिअरच्या सुरुवातीच्या काळात मात्र त्यांना संघर्ष करावा लागला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या काळी त्यांनी समस्या सोडवण्यासाठी एका तांत्रिकाची मदत घेतलेली. त्याबद्दल त्यांनी स्वत: खुलासा केला आहे.

महेश भट्ट यांनी नुकतीच त्यांची लेक अभिनेत्री पूजा भट्टच्या पॉडकास्टवर संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या काळात निर्माता म्हणून ते संघर्ष करीत होते तेव्हा त्यांचे मित्र अरुण देसाईसुद्धा संघर्ष करीत होते. त्यावेळी त्यांनी महेश यांना बिहारमधील एका व्यक्तीला भेटण्याचा सल्ला दिला, जो त्यांच्या चित्रपटाचा निर्माता होऊ शकत होता. अरुण यांनी सांगितलं की, त्यांना वाराणसीहून बिहारला जायचं आहे. कारण- तिथे त्यांचे गुरू आहेत, ज्यांना भेटायचं आहे.

महेश भट्ट यांनी याबद्दल सांगितलं, “त्या गुरुजीला भेटण्यासाठी अनेक गरीब लोकांची मोठी रांग लागली होती. तो एक तरुणच होता, ज्याच्या हातात दारूची बाटली होती आणि तो नाचत होता. त्यानं माझ्याकडे पाहताच त्याला कळलेलं की, माझा त्याच्या या अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीवर विश्वास नाहीये. त्या तांत्रिकने आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलावलं आणि तुला तुझ्या समस्येवर एक तोडगा सांगतो, असं म्हणाला.”

महेश भट्ट यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

महेश यांनी पुढे सांगितलं, “जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो तेव्हा त्यानं त्याच्या घरातील कपाटातून एक चेंडूच्या आकाराची कागदात गुंडाळलेली वस्तू काढली आणि सांगितलं की, हे एका माणसाचं मांस आहे जे घाटावरून आणण्यात आलं आहे. हे घेऊन जा आणि त्या व्यक्तीला खाऊ घाल तो तुला पैसे द्यायला तयार होईल.”

महेश भट्ट याबद्दल सांगत पुढे म्हणाले, “बिहारमध्ये एक जमीनदार होता, जो मच्छरदाणीच्या आत बसलेला असायचा आणि त्याचे अंगरक्षक बंदूक घेऊन बाहेर असायचे. त्यावेळी आम्ही त्याला हे मांस कसं खाऊ घालू शकतो या विचारात होतो. मग आम्ही ठरवलं की, खायचं पान घेऊन, त्यात टाकून देऊ शकतो. आम्ही तसं केलंही आणि आम्हाला वाटलं की, तो आता पैसे देईल; पण ज्या व्यक्तीला ते कथित मांस खाऊ घातलेलं त्यानं दुसऱ्या दिवशी पैसे दिलेच नाहीत.”