Bollywood Director shares Incident: महेश भट्ट हे दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘आशिकी’, ‘सडक’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘मर्डर’, ‘गँगस्टर’, अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करत बॉलीवूडमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.

महेश भट्ट हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या चित्रपटात काम केलेले कलाकारदेखील काही आठवणी सांगतात. आता महेश भट्ट यांनी त्यांच्या बालपणातील आठवण सांगितली आहे.

“भिंतीकडे ढकलले…”

महेश भट्ट यांनी मुलगी पूजा भट्टच्या ‘द पूजा भट्ट’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी महेश भट्ट म्हणाले, “मी एका संध्याकाळी माझ्या घरी जात होतो, अचानक चार तरुण मुलांनी मला वेढले. त्यांनी मला विचित्रपणे पकडले आणि भिंतीकडे ढकलले, मी खूप घाबरलो होतो. देवाने मला वाचवावे यासाठी मी देवाचा धावा सुरू केला. मला घरी जाऊ द्या म्हणू मी त्यांच्याकडे भीक मागितली. त्यांनी जो माझ्याभोवती वेढा घातला होता, तो मोडण्याचा प्रयत्न केला.”

“मी ढसाढसा रडायला सुरुवात…”

महेश भट्ट पुढे म्हणाले, “मी त्यांच्याकडे याचना केल्यानंतर त्यांनी मला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. मला अपेक्षा होती की वाटेवरून जाणाऱ्यांपैकी कोणीतरी मला मदत करेल. पण, त्यांच्या दैनंदिन गोष्टी सुरळीतपणे सुरू होत्या. कोणीही माझी मदत केली नाही. त्यातील एक मुलगा म्हणाला की त्याची पँट खाली खेच. पण, ते काही करण्याआधी मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो.”

“मी मोठ्याने किंचाळत त्यांना विचारले की तुम्ही माझ्याबरोबर असे का वागत आहात? ते म्हणाले की तू आमच्यातलाच एक आहेस की नाही हे आम्हाला पाहायचं आहे. तुझी आई तुझ्या वडिलांची ठेवलेली बायको आहे ना? त्यानंतर माझ्या आईला शिवीगाळ करत म्हणाले ती मुस्लीम आहे ना, जी कमी दर्जाच्या चित्रपटांमध्ये नृत्याचे सीन करत असे. तुझं नाव मग महेश कसं काय आहे? त्यांच्या या प्रश्नांमुळे मी ढसाढसा रडायला सुरुवात केली.”

“अचानक मी त्यांच्या डोळ्यात…”

“जेव्हा मी त्या मुलांना म्हणालो की मला सोडा नाहीतर मी तुमचे नाव माझ्या वडिलांना सांगेन. त्यावर ते माझ्यावर हसले. ते मला म्हणाले की आता तुझे वडील कुठे आहेत? ते कुठे राहतात? ते तुझ्या घरात राहतात का? तू आम्हाला खरं सांग, त्यानंतर आम्ही तुला जाऊन देऊ. मी त्या मुलांना म्हणालो की मी शपथ घेऊन सांगतो की माझे वडील आमच्याबरोबर राहतात. सध्या ते आऊटडोअर शूटिंगसाठी बाहेरगावी गेले आहेत. मी जरी असे म्हणालो तरी त्यात तथ्य वाटत नव्हते.”

“अचानक मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो की माझे वडील आमच्याबरोबर राहत नाहीत. ते त्यांच्या पत्नीबरोबर राहतात. माझ्या दुसऱ्या आईबरोबर अंधेरीमध्ये राहतात. माझं बोलणं ऐकल्यानंतर त्या मुलांनी माझ्याभोवती जो वेढा घातला तो काढला आणि मला जाऊ दिले.

महेश भट्ट यांनी पुढे असाही खुलासा केला की, या घटनेनंतर त्यांचे त्यांच्या आई व भावंडांशी नाते बदलले. कुटुंबातील गुपित सांगून मी धोका दिला आहे, असे त्यांना वाटले.

महेश भट्ट यांच्या वडिलांचे नाव नानाभाई भट्ट तर आईचे नाव शिरीन मोहम्मद अली आहे. दरम्यान, महेश भट्ट यांच्या रिलेशनशिपची देखील मोठी चर्चा होताना दिसते. त्यांनी लॉरेन ब्राईटशी लग्न केले होते. मात्र, त्यादरम्यान ते परवीन बाबीच्या प्रेमात पडले. हे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर ते ब्रिटीश अभिनेत्री-दिग्दर्शक सोनी राजदान यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना आलिया ही मुलगी आहे. आलिया सध्या बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.