Mahesh Manjrekar Talk About Salman Khan : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. ते त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक स्वभाव यांमुळे कायमच चर्चेत असतात. इतकंच नव्हे, तर त्यांच्या मैत्रीचेसुद्धा अनेक किस्से आहेत. बॉलीवूडचा दबंग म्हणजेच अभिनेता सलमान खानही त्यांचा खास मित्र आहे.
सलमान खान आणि महेश मांजरेकरांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत महेश मांजरेकरांनी मित्र सलमान खानसह एकत्र काम करणार नसल्याचं म्हटलं आहे. ‘अंतिम’ सिनेमातही दोघांनी एकत्र काम केलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केलं होतं आणि सलमान खान त्यात मुख्य भूमिकेत होता. मराठीतल्या ‘मुळशी पॅटर्न’चा तो रिमेक होता. महेश मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी माझा कट्टाशी साधलेल्या संवादात सलमान खानसह पुन्हा काम करणार नसल्याचं सांगितलं.
त्याबद्दल महेश मांजरेकर म्हणाले, “मला आठवतंय की, कॅन्सरनंतर माझा वाढदिवस होता. नुकतंच ऑपरेशन झालं होतं. मला बाहेर कुठे जाणं शक्य नव्हतं. तेव्हा ‘इंडियन आयडॉल’चे फायनलिस्ट घरी आले होते. त्यांनी सगळ्यांनी गाणी वगैरे म्हटली. एन्जॉय केलं आणि रात्री ३ वाजता सलमान घरी आला आणि म्हणाला, ‘मला का नाही बोलावलं?’. त्याच्यावर मी चिडलो होतो. तो मला म्हणाला, ‘तू मला शिवी दिलीस’. तर मी त्याला म्हणालेलो की ‘सलमान, मी तुला नाही तुझ्यामधल्या दिग्दर्शकाला बोलतोय’.”
“सलमानबरोबर पुन्हा सिनेमा करणार नाही” : महेश मांजरेकर
त्यानंतर महेश मांजरेकर सांगतात, “सलमानबरोबर मी ‘अंतिम’ सिनेमा केला; पण आता त्याच्याबरोबर पुन्हा दुसरा सिनेमा करणार का? असं विचारलं; तर माझं उत्तर असेल ‘नाही’. सलमानला वाटतं की, त्याला सिनेमा कळतो. कारण- त्याचे वडील सिनेमा निर्माते आहेत. त्यामुळे त्याच्यातसुद्धा एक दिग्दर्शक लपला आहे. माझं म्हणणं होतं की, तू मला दिग्दर्शक म्हणून सिनेमा दिलास ना? मग बाकीच्या गोष्टी विसर.”
“सलमान खान माणूस म्हणून खूप चांगला” : महेश मांजरेकर
पुढे महेश मांजरेकरांनी त्याचं कौतुक करत म्हटलं, “सलमान माणूस म्हणून खूप चांगला आहे. तो कोणत्याच गोष्टीसाठी मला नाही म्हणत नाही. एखाद्या कार्यक्रमाला वगैरे मी त्याला बोलावलं की, तो मला कधीच नाही म्हणत नाही. मदत करायला तो कायम तत्पर असतो.” दरम्यान, २०२१ मध्ये सलमान आणि महेश मांजरेकरांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा सिनेमा आला होता. सलमानच्या या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर विशेष असा प्रतिसाद मिळाला नव्हता.
