Metro In Dino box office collection day 1: सारा अली खान व आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट अखेर शुक्रवारी (४ जुलै रोजी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

या रोमँटिक म्युझिकल चित्रपटात फातिमा सना शेख, अली फजल, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि अनुपम खेर यांनीही विविद भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी असूनही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

‘मेट्रो इन दिनों’ पहिल्या दिवसाची कमाई

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी भारतात ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाने ३.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटाची सिनेमागृहांमध्ये एकूण १३.६२ टक्के ऑक्युपेन्सी होती. सकाळच्या शोची ८.६४ टक्के, दुपारच्या शोची १४.२४ आणइ संध्याकाळी १७.९९ टक्के ऑक्युपेन्सी होती. ‘मेट्रो इन दिनों’ ला पहिल्या दिवशी बंगळुरूत सर्वाधिक २८.३३ टक्के प्रेक्षक मिळाले. ‘मेट्रो इन दिनों’चे बजेट ८५ कोटी रुपये आहे.

‘मेट्रो इन दिनों’ची अॅडव्हान्स बुकिंगमधील कमाई निराशाजनक राहिली. सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगमधून फक्त ५०-६० लाख रुपयांचे कलेक्शन झाले, जे खूप कमी आहेत. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे, चित्रपट पहिल्या वीकेंडला किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आधी रिलीज झालेल्या ‘सितारे जमीन पर’ व ‘मा’ याशिवाय इतर मोठा बॉलीवूड सिनेमा सध्या थिएटरमध्ये रिलीज झालेला नाही. त्यामुळे वीकेंडला ‘मेट्रो इन दिनों’ शुक्रवारपेक्षा जास्त कमाई करण्याची शक्यता आहे. आमिरचा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिस गाजवतोय, तर काजोलचा ‘मा’ चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. या दोन्ही चित्रपटांबरोबर ‘मेट्रो इन दिनों’ची स्पर्धा आहे.

‘मेट्रो इन दिनों’ हा ‘लाइफ इन अ… मेट्रो’ (२००७) या सिनेमाचा सिक्वेल आहे. दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनची तुलना करायची झाल्यास ‘लाइफ इन अ… मेट्रो’ ने पहिल्या दिवशी ८७ लाख रुपये कमावले होते. या चित्रपटाचे त्यावेळचे जगभरातील एकूण कलेक्शन २४.३१ कोटी रुपये होते.