Popular Singer on Smart Investments: मिका सिंग हा जितका त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो, तितकाच त्याच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. ९९ घरे आणि १०० एकर जमिनीचा मालक असलेला हा गायक त्याच्या स्मार्ट गुंतवणुकीबाबत अनेकदा बोलताना दिसतो.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने इतर गोष्टींमध्ये खर्च करण्यापेक्षा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्याने एका मुलाखतीत दिला. तसेच, त्याचे ९९ वे घर शाहरुख खानची पत्नी गौरी खानने डिझाइन केल्याचा खुलासादेखील त्याने केला. त्याबरोबरच त्याने नवीन गायकांना त्यांनी कमावलेले पैसे विचारपूर्वक गुंतवावेत आणि खर्च करावेत, असा सल्लाही त्याने दिला.

मिका सिंग काय म्हणाला?

‘गल्लाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मिका सिंग म्हणाला, “मी ९९ घरांचा मालक आहे. काही महागडी आहेत, काही लहान आहेत, काही मोठी आहेत, तर काही गावांत आहेत. ती घरे कशी आहेत, हे महत्त्वाचे नाही, तर तुमची मालमत्ता किती आहे, हे महत्त्वाचे आहे. माझ्याकडे इतकी संपत्ती असल्याने काही लोकांना माझे कौतुक वाटते; तर काही लोक माझ्याविषयी वाईट बोलतात. त्यांचे म्हणणे असते की, माझे लग्नही झाले नाही, तर इतक्या मालमत्तेकडे लक्ष कोण देणार?”

पुढे मिका सिंग असेही म्हणाला, “आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. आम्हाला हे माहीत नव्हते की, पैसे कुठे खर्च करायचे आणि कुठे गुंतवणूक करायची. आम्हाला एकच गोष्ट माहीत होती की, आपण जमीनदार असले पाहिजे. माझे आजोबा एक गोष्ट नेहमी सांगायचे की, जमीन तुम्हाला कधीही धोका देणार नाही. आतापर्यंत मी खूप पैसे कमावले आहेत. मला फक्त इतकेच माहीत होते की, आपण मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.”

“लोकांना वाटते की, मिका सिंग चैनीच्या वस्तूंवर खर्च करतो. लोक माझ्याबद्दल असा विचार करतात की, मी मुलींबरोबर नाचतो आणि त्यांच्यावर पैसे खर्च करतो; पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. मी जितके पैसे कमावले, तितक्या पैशांची मी मालमत्तेत गुंतवणूक केली. इंडस्ट्रीमध्ये मी एकटा असा गायक नाही की जो श्रीमंत आहे. इतरही अनेक गायक आहेत, ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत. पण, ते ब्रॅण्डेड वस्तूंवर पैसे खर्च करतात. तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. बचत करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही खर्च करा; पण सगळेच पैसे खर्च करू नका, काही पैशांची बचत करा. सगळेच पैसे खर्च करणे मूर्खपणाचे आहे”, असा सल्ला मिका सिंगने दिला.

मिका सिंगने असाही खुलासा केला की, आतापर्यंत त्याने जी मालमत्ता खरेदी केली आहे किंवा त्याच्याकडे जितकी संपत्ती आहे, ती सगळी त्याची आहे. तो म्हणाला, “मला याबाबत सल्ला देणारे किंवा याबद्दल मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. गेल्या ३० वर्षांपासून मी एकटा राहतो. मी दलेर यांच्या संपर्कात असतो, मी त्यांचा माझ्या गाण्यांबाबत सल्ला घेतो. मात्र, माझ्या आयुष्यातल्या काही निर्णयांबाबत घेत नाही. मी माझ्या स्वतःच्या शहाणपणाने विचारपूर्वक गोष्टी करीत शिकत राहिलो.”