Chirag Paswan Left Bollywood And Joins Politics : मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे पुढे जाऊन राजकारणात उतरले आणि त्यात पुढे यशस्वीही झाले. सध्याही अनेक कलाकार मनोरंजन आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत सक्रिय आहेत. अशाच एका कलाकारानं आपला पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरल्यानं राजकारणात प्रवेश केला आणि आता त्यातच सक्रिय आहे.

आताचे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि काही वर्षांपूर्वीचे अभिनेते चिराग यांनी आपला पहिलाच बॉलीवूड सिनेमा फ्लॉप ठरला म्हणून राजकारणात एन्ट्री केली. ‘मिले ना मिले हम’ या पहिल्या सिनेमातून चिराग यांनी बॉलीवूडमध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. यात चिराग यांच्यासह अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतसुद्धा होत्या.

पहिल्या फ्लॉप सिनेमानंतर चिराग पासवान यांनी सोडलं बॉलीवूड

‘मिले ना मिले हम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अपयशी ठरला. तो एक कोटी रुपयांचाही व्यवसाय करू शकला नाही. सिनेमाची जगभरातील एकूण कमाई केवळ ९७ लाख रुपये, तर भारतातील कमाई ७७ लाख रुपये इतकी होती. या सिनेमाच्या अपयशानंतरही कंगना रणौत पुढे अनेक मोठ्या चित्रपटांची मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली, पण चिराग पासवान यांनी इंडस्ट्री सोडून मुंबईतून परत आपल्या मूळगावी म्हणजेच बिहारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीत चिराग म्हणाला होते, “मी मुंबईत चांगलाच स्थिरावलो होतो. काही वर्षे आणखी काम केलं असते तर मी बॉलीवूडमध्ये स्वतःचं नावही कमावू शकलो असतो. पण, मी इतर राज्यांत बिहारी लोकांचा होणारा अपमान, त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक खूप जवळून बघितली. ‘बिहारी’ हा शब्दच शिवी म्हणून वापरला जात होता, यामुळेच मी राजकारणात आलो.”

दरम्यान, चिराग पासवान हे दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे सुपुत्र आहेत. २०२० मध्ये ७४ व्या वर्षी रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर चिराग लोक जनशक्ती पक्षात सक्रिय झाले. नंतर २०१४ मध्ये ते प्रथमच जमुई येथून खासदार झाले आणि सध्या ते हाजीपूरचे खासदार आहेत.

आता लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष असलेले चिराग पासवान यांना गेल्या वर्षी एनडीए सरकारमध्ये केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्रिपद देण्यात आले. त्यांच्या लोक जनशक्ती पक्षाने नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत २९ पैकी १९ जागांवर विजय मिळवला आहे.