Mumtaz on Shammi Kapoor: बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री मुमताज ‘नागीन’, ‘प्रेम कहानी’, ‘प्यार का रिश्ता’, यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. आता नुकत्याच एका मुलाखतीत मुमताज यांनी शम्मी कपूर यांच्याबरोबर त्यांनी लग्न का केले नाही, यावर खुलासा केला आहे.

मुमताज व शम्मी कपूर यांचे का होऊ शकले नाही लग्न?

मुमताज यांनी नुकतीच विकी लालवाणीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना शम्मी कपूर यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारले. त्यावर मुमताज म्हणाल्या, “शम्मी कपूर खूप सुंदर दिसायचे आणि मला ते खूप आवडायचे. त्यामध्ये लपवण्यासारखे किंवा नाकारण्यासारखे काही नाही. आमच्यात १७-१८ वर्षांचे अंतर होते. पण, मी त्याचा इतका विचार करीत नसायचे. मला त्यांच्याबरोबर लग्न करायचे होते; पण त्यावेळी राज कपूर यांचा मोठा दरारा होता. घरची सून काम करणार नाही, हा त्यांचा नियम होता आणि त्यावर ते कायम होते. पण, मला करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते.”

पुढे राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात भूमिका न दिल्याबद्दल मुमताज म्हणाल्या, “मी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटासाठी लूक टेस्ट दिली होती. फोटो चांगले आहेत, असे मलाही वाटले. पण राज कपूर म्हणाले की, चित्रपटातील भूमिकेसाठी नायिकेला शॉर्ट कपडे घालावे लागतील. जर तू आमच्या घरची सून झालीस, तर हे चालणार नाही. मी तुला ही भूमिका देऊ शकत नाही. मी त्यांना सांगितले की, मी आणि शम्मी कपूर लग्न करणार नाही. ते स्वत: शम्मी कपूरला विचारू शकतात. पण, त्यांना अशी काळजी वाटत होती की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांशी लग्न न करण्याचा निर्णय बदलला, तर पुढे ते होईल. त्यामुळे मला त्या चित्रपटात भूमिका मिळाली नाही.”

पुढे मुमताज म्हणाल्या, त्यांचे बरोबर होते. त्यांना असे वाटत होते की. मी आणि शम्मी कपूर यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लग्न केले, तर चित्रपट अर्धवट राहील. एखादा चित्रपट बनवण्यास कोट्यवधी रुपये लागतात. त्यांना धोका पत्करायचा नव्हता. मी त्यांच्या मताचा आदर करते. घरातील सुना काम करणार नाहीत, हा पृथ्वीराज कपूर यांनी बनवलेला नियम होता. ते जुन्या विचारांचे होते.”

जेव्हा मुमताज यांनी लग्न केले, त्यावेळी त्यांच्या सासऱ्यांचीदेखील अशीच अट होती. विशेष बाब म्हणजे त्यावेळी त्यांनी ही अट मान्य केली. कारण- त्यांच्या पालकांचे असे म्हणणे होते की, काही वर्षांत भूमिका मिळणे बंद होईल. त्यामुळे मुमताज यांनी ही अट मान्य केली होती.

दरम्यान, याच मुलाखतीत मुमताज यांनी राजेश खन्ना व अंजू महेंद्रू यांच्या नात्याबद्दलही वक्तव्य केले. जर राजेश खन्ना अंजूबरोबर राहिले असते, तर आज जिवंत असते. कारण- ती त्यांची खूप काळजी घ्यायची, असे वक्तव्य मुमताज यांनी केले.