ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली सोढी सध्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्या कॅन्सरवरील उपचार व केमोथेरपीचा प्रवास इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांशी शेअर करत असतात. केमोथेरपीमुळे नफीसा अलींचे केस गळत आहेत. नफीसा यांच्या डोक्यांवरील केस त्यांच्या नातवांनी कापले. त्यांनी काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

नफीसा अली यांनी कर्करोगासाठी केमोथेरपी पुन्हा सुरू केली आहे. कर्करोग चौथ्या टप्प्यात आहे. नफीसा अली यांना कर्करोगाचे निदान २०१८ मध्ये झाले होते आणि २०१९ मध्ये त्यांनी कर्करोगावर मात केली होती. पण त्यांचा कॅन्सर रिलॅप्स झाला आहे. त्यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं आहे.

नफीसा अली यांनी गुरुवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून आणखी एक अपडेट शेअर केली. फोटो आणि व्हिडीओमध्ये त्यांची नातवंडे गळणारे केस काढण्यास मदत करताना दिसत आहेत. व्हिडीओत चिमुरडी नातवंडे नफीचा यांचे केस कापताना दिसत आहेत.

“अखेर, माझ्या लहान नातवंडांनी माझ्या केस गळतीत मदत केली,” असं कॅप्शन नफीसा अली यांनी फोटोला दिलं आहे.

पाहा पोस्ट

नफीसा यांना २०१८ मध्ये पहिल्यांदा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यांना थकवा जाणवत होता, त्यामुळे त्यांनी चाचण्या करून घेतल्या. डॉक्टरांनी नफीसा यांना क्षयरोग आहे, असं निदान केलं. पण त्यांना विश्वास बसला नाही. मग त्यांनी पीईटी स्कॅन करायला सांगितलं. रिपोर्ट्समध्ये त्यांना कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यांनी कर्करोगावर मात करायचं ठरवलं.

कॅन्सरचे चुकीचे निदान आणि गोंधळाचा नफीसावर खोलवर परिणाम झाला. “कॅन्सर मार्कर चाचण्या उपलब्ध आहेत, त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांना विचारा. उगाच पैसे खर्च करू नका. योग्यरित्या न केल्यास बायोप्सी ही सर्वात वाईट गोष्टींपैकी एक आहे. कारण ज्या क्षणी डॉक्टरांनी ट्यूमरला सुई टोचली, त्याच क्षणी कर्करोग पसरला आणि मी कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचले,” असं त्या म्हणाल्या.

“मी नुकतीच ऑस्ट्रेलियाहून परतले होते. तीन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा कर्करोग झाल्याचं आढळलं. उपचार केले, पण नियमित पीईटी स्कॅननंतर डॉक्टरांनी सांगितले की हा चौथ्या स्टेजचा आहे, त्यामुळे तो बरा होऊ शकत नाही. डॉक्टरांनी केमोथेरपी सुचवली. ही एक अतिशय विषारी प्रक्रिया आहे. मला ती अजिबात आवडत नाही,” असं नफीसा म्हणाल्या.