मुंबईत झालेले १९९३ सालचे बॉम्बस्फोट हे प्रत्येक मुंबईकरांच्या आठवणीत असतीलच. या स्फोटाने संपूर्ण मुंबई शहर हादरलं होतं. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात २५७ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि ७१३ जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेत अनेक मोठ्या डॉनच्या नावांबरोबर अभिनेता संजय दत्तचाही सहभाग होता. १९ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आणि त्याच्या घरातून एके-५६, हँड ग्रेनेड बॉम्ब आणि काही गोळ्या जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर २००७ मध्ये संजय दत्तला ६ वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेत संजय दत्तचे नाव येताच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता. पण एक व्यक्ती होती, जिने या घटनेला स्पष्ट विरोध केला होता आणि संजय दत्तबरोबर पुन्हा कधीही काम करणार नसल्याचं म्हटलं होतं. ही व्यक्ती म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. कारण नाना पाटेकर यांनी या स्फोटात त्यांचा भाऊ गमावला होता. त्यामुळे ते संजय दत्तवर नाराज होते.
नाना पाटेकर यांनी संजय दत्तच्या फेब्रुवारी २०१४ मधील पॅरोल वाढीवर जोरदार टीका केली होती. ‘फर्स्ट पोस्ट’नुसार, नाना पाटेकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं, “मी माझ्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्याबरोबर काम केलेले नाही. भविष्यातही मी त्याच्याबरोबर काम करणार नाही. सरकारला जे काही करायचे ते करेल. पण माझ्या हातात जे असेल ते मी करेन. तुम्ही त्याचे चित्रपट पाहता आणि त्याला हिरो बनवता आणि नंतर तुम्ही म्हणता की, त्याला पॅरोल मिळू नये. या अशा गोष्टी चालत नाहीत.”
पुढे नाना पाटेकरांनी म्हटलं होतं, “माझ्या पत्नीने त्यावेळी दुसरी बस घेतली नसती, तर तिचाही बॉम्बस्फोटात मृत्यू झाला असता. मी असे म्हणत नाही की, संजय दत्त याला जबाबदार आहे. पण यात त्याचा सहभाग आहे. त्यामुळे मी त्याला ही एकमेव शिक्षा देऊ शकतो की, मी त्याच्याबरोबर काम करणार नाही. मी हे त्या लोकांसाठी करत आहे, ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले.” त्यानंतर नाना पाटेकर व संजय दत्त यांनी एकत्र काम केलेलं नाही.
दरम्यान, आता ‘हाऊसफुल्ल ५’ या चित्रपटात नाना पाटेकर व संजय दत्त हे दोन्ही कलाकार एकत्र असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचं पहायला मिळत आहे. पण आता चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आहे की नाही? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समोर येईल. येत्या ६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.