ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. ते सामाजिक व राजकीय विषय, चित्रपट, सह-कलाकार यांच्याबद्दलची त्यांची मतं मांडत असतात. गेल्या काही वर्षांत, राजेश खन्ना आणि दिलीप कुमार ते अमिताभ बच्चन अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांबद्दलच्या त्यांच्या मतांमुळे ते चर्चेत राहिले. आता, नसीर यांची एक जुनी मुलाखत ऑनलाइन व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्यांनी आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्यांबद्दल विधानं केली होती.

खान, कुमार, देवगण या लोकप्रिय स्टार्सचे चित्रपट पाहता का? आणि त्यांच्या अभिनयाचं तुम्हाला कौतुक वाटतं का? असं नसीरुद्दीन शाह यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर शाह यांनी स्पष्ट उत्तर दिलं. “नाही, आणि मी त्यांचे चित्रपट पाहण्याचा प्रयत्नही करत नाही. मी त्यांच्यापैकी अनेकांबरोबर काम केलं आहे, पण त्यांच्यापैकी कोणीच मला खरंच प्रभावित केलं नाही. फक्त अक्षय कुमार आहे, ज्याचं मला खूप कौतुक वाटतं. कारण कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय, गॉडफादरशिवाय आणि पाठिंब्याशिवाय त्याने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आता त्याची अभिनय क्षमता आपल्या दिसून येतेय. इतके दिवस काम केल्यानंतर, आता तो खरंच एक चांगला अभिनेता झाला आहे,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले होते.

शाहरुख खानबद्दल काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

मुलाखत घेणाऱ्याने म्हटलं की शाहरुख खाननेही कोणाच्याही पाठिंब्याशिवाय खूप यश मिळवले आहे. यावर नसीरुद्दीन शाह म्हणाले, “हो, आणि त्यासाठी मला शाहरुखचं खूप कौतुक आहे. पण एक अभिनेता म्हणून तो कंटाळवाणा (बोरिंग) होत चालला आहे.”

नसीरुद्दीन शाह यांनी अक्षय कुमार आणि शाहरुख खान या दोघांबरोबरही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अक्षयबरोबर त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘मोहरा’ होय. तर, शाहरुख खानबरोबर त्यांनी ‘कभी हां कभी ना’, ‘चमत्कार’ आणि ‘मैं हूँ ना’ या सिनेमांमध्ये काम केलंय.

‘मैं हूं ना’ चित्रपटाची दिग्दर्शक फराह खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांच्या कास्टिंगचा अनुभव सांगितला होता. ती हसत म्हणाली, “ही खूप मोठी गोष्ट आहे. नसीर मला मारून टाकेल.” मग तिने सविस्तर सगळं सांगितलं. “मी पहिल्यांदा खलनायकाची भूमिका घेऊन नसीर यांच्याकडे गेले होते. खलनायकाच्या भूमिकेसाठी आम्ही अनेक लोकांकडे गेलो होतो. पण सर्वात आधी नसीरकडे गेलो होतो. पण त्यांनी खूप गोंधळ घातला. नसीर कसे आहेत, सर्वांना माहित आहेत. ते खूप मूडी आहेत. त्यांनी ही भूमिका करायला नकार दिला होता,” असं फराह खान म्हणाली. नंतर नसीरुद्दीन शाह ब्रिज शेखर प्रसाद शर्माची भूमिका साकारायला तयार झाले होते.