Nawazuddin Siddiqui Talks About His Lavish home : अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुंबईत आलिशान घरं आहेत. अनेक जण शहरातील पॉश एरियामध्ये आलिशान आणि महागडे अपार्टमेंट खरेदी करीत असल्याचं पाहायला मिळतं. अलीकडेच विजय वर्मा, संजय मिश्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारख्या अनेकांनी नवीन घर खरेदी केलं आहे. तर नुकतंच रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्या आलिशान घराचं कामही पूर्ण झालं आहे. अशातच आता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या नवीन घराबद्दल सांगितलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीनं ‘पिंकव्हिला’शी संवाद साधताना त्याच्या घराबद्दल माहिती दिली आहे. यावेळी त्याच्या घराची झलक पाहायला मिळतेय. नवाजुद्दीननं त्याच्या घरातील भिंतींवर थिएटरसंबंधित गोष्टी ठेवल्या असून, त्यानुसार ती डिझाइन केलेली दिसते. तो म्हणाला, “या घरात सगळ्यात चांगली गोष्ट जी मला वाटते, ती म्हणजे ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’ यांची पोस्टर्स.

अभिनेता पुढे म्हणाला, “मला डिझाइन्स खूप आवडतात. घराबाहेरही मी स्वत: डिझाइन केली आहे. घरात मोकळं ढाकळं वाटावं म्हणून मोठमोठ्या खिडक्या बनवल्या आहेत.” घरामध्ये त्यानं सिनेमाशी संबंधित गोष्टींचा वापर करून डिझाइन केली आहे. सिनेमाप्रेमींना त्याचं हे घर खूप आकर्षित करणारं ठरेल. त्याबद्दल तो म्हणाला, “इथे बसून आम्ही चित्रपट बघतो, चर्चा करतो, बाल्कनी खूप छान आहे. सगळीकडे हिरवागार परिसर आहे. त्यामुळे बाहेर बसून गप्पा मारण्यात वेगळीच मजा आहे.”

नवाजुद्दीन सिद्दीकी पुढे म्हणाला, “घरामध्ये जिमही आहे, जिथे सगळ्या मशीन्स आहेत आणि दोन लोक एका वेळी आरामात व्यायाम करू शकतात.” परंतु, या घरातील त्याची स्वत:ची बेडरूम मात्र सगळ्यात छोटी असल्याचं त्यानं म्हटलं. त्यामागचं कारण सांगताना तो म्हणाला, “कितीही लोकप्रियता मिळाली तरीही माझे पाय जमिनीवर राहावेत यासाठी माझी बेडरूम सगळ्यात लहान बनवला आहे.” नवाजुद्दीननं त्याच्या घराला त्याच्या वडिलांचं नमाम (Namam), असं नाव दिलं आहे.

नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “मित्रांबरोबर गप्पा मारणं, जेवण करणं, चित्रपटांबद्दल चर्चा करणं हा वेळ सगळ्यात चांगला असतो. अभिनयाबद्दल बोलत असताना कळतही नाही की कधी संध्याकाळ झाली आहे.” त्यानं त्याच्या घरातील किचनबद्दल पुढे सांगितलं की, “थीम व्हाईट ठेवली आहे आणि हो, मला वरण, बटाट्याची भाजी, वांग्याचं भरीत हे सगळं बनवता येतं.”

शेवटी अभिनेता म्हणाला, “खरं सांगू घर, गाड्या हे काही खरं यश किंवी मोठी उपलब्धी नाही; पण खरं यश म्हणजे जेव्हा तुम्हाला हवं तसं काम करण्याची संधी मिळते आणि तुम्ही ते करण्यात यशस्वी होता.”