आमिर खानची मुलगी आयरा खानने ३ जानेवारी २०२४ रोजी मराठमोळ्या नुपूर शिखरेशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला दीड वर्षांहून जास्त काळ झाला आहे. आयरा व नुपूर यांचं लग्न खूप चर्चेत राहिलं होतं. कारण नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी नुपूर शिखरे धावत लग्नस्थळी पोहोचला होता.

नुपूर शिखरे हा जिम ट्रेनर आहे. त्याच्या वडिलांचं निधन झालंय. तो आई प्रितम शिखरे यांच्याबरोबर राहतो. आमिरची लेक आयरा खान एका मराठमोळ्या जिम ट्रेनरशी लग्न करतेय ही बातमी माध्यमांमध्ये खूप चर्चेचा विषय ठरली होती. नुपूर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. त्याला सुरुवातीपासून फिटनेसची आवड होती आणि त्याने त्यातच करिअर करायचं ठरवलं.

आयरा व नुपूरची ओळख व भेट आमिर खानमुळेच झाली. नुपूरने आमिर खानला एका चित्रपटासाठी ट्रेन केलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी आमिर खानच्या टीममधून नुपूरला फोन गेला. तो फोन आयराला ट्रेनिंग देण्यासाठी होता. नुपूर नंतर आयरा खानला फिटनेस ट्रेनिंग देऊ लागला. दोघेही एकमेकांना २०१५ पासून ओळखतात. आयरा शिक्षणासाठी बाहेर गेल्यावर नुपूर तिचे ऑनलाइन क्लासेस घ्यायचा, अशी माहिती नुपूरने दिली.

नुपूर व आयराच्या वयातील अंतर

नुपूर व आयरा २०१९ मध्ये जवळ आले. नंतर ते डेट करू लागले. नुपूरने सांगितलं की आयराच्या कुटुंबाला दोघेही डेट करत आहेत, याची कल्पना होती. तसेच हा टाइमपास नसून दोघेही एकमेकांबद्दल गंभीर आहोत, हेही माहीत होतं. मित्र म्हणे पॉडकॉस्टमध्ये नुपूरने त्याच्या व आयराच्या वयातील अंतराबाबतही सांगितलं. आयरा खानपेक्षा नुपूर साडेबारा वर्षांनी मोठा आहे. नुपूर सासऱ्यांपेक्षा २० वर्षांनी लहान आहे.

नुपूरचा जन्म १७ ऑक्टोबर १९८५ रोजी झाला होता. तर आयराचा जन्म १९९७ मध्ये झाला. दोघांच्या वयात खूप अंतर आहे. नुपूर लवकरच ४० वर्षांचा होईल, तर आयरा खान २८ वर्षांची आहे. आयरा खान खूप समजूतदार आहे. तसेच खान कुटुंब खूप प्रेमळ आहे. सर्वजण एकमेकांना सांभाळून घेतात. सासरे स्टार असल्याचं वेगळेपण त्यांच्या वागण्यातून जाणवत नाही, असं नुपूरने आवर्जून सांगितलं.

दरम्यान, नुपूर शिखरे मिथिला पालकर, तसेच इतर अनेक कलाकारांचा फिटनेस ट्रेनर आहे. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. नुपूर व त्याच्या आईचे मजेशीर रील्स खूप चर्चेत असतात. बरेचदा आयरा खान या दोघांचे व्हिडीओ रेकॉर्ड करते. काही वेळा आयरादेखील त्यांच्या मजेशीर रील्सचा भाग होते. त्यांच्या रील्सवर चाहते तसेच सेलिब्रिटी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात.