२५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग म्हणजेच ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटावरून नुकताच गोंधळ उडाला होता. चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे उर्फ ​​बाबू भैय्या यांची भूमिका साकारणारे अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेत असल्याची घोषणा केली. यानंतर निर्मिती कंपनीने त्यांच्यावर २५ कोटींचा दंड ठोठावला; तेव्हा त्यांनी त्यांची साइनिंग रक्कम (११ लाख रुपये) व्याजासह निर्मात्यांना परत केली.

यानंतर परेश रावल यांचे ‘हेरा फेरी ३’ चित्रपटात पुन्हा परतण्याचे सगळे मार्ग संपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही चित्रपटाच्या आणि परेश यांच्या चाहत्यांना अभिनेते पुन्हा येण्याची आस लागून राहिली आहे. त्यामुळे चाहते सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून त्यांना परत येण्यासाठी सांगत आहेत. अशातच सोमवारी, एका चाहत्याने परेश रावल यांना एक्स पोस्टवर याबद्दल विचारणा केली.

चाहत्याने कमेंट करत परेश यांना असं म्हटलं. “सर कृपया ‘हेरा फेरी’ चित्रपटात सामील होण्याबद्दल पुन्हा एकदा विचार करा. तुम्ही या चित्रपटाचे नायक आहात.” यानंतर चाहत्याच्या या प्रश्नावर परेश यांनी दिलेल्या उत्तराने ते पुन्हा चित्रपटात एन्ट्री करणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. चाहत्याच्या ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा परतण्याबद्दल परेश यांनी मोजक्याच शब्दांत उत्तर देताना असं म्हटलं, “नाही… ‘हेरा फेरी’मध्ये तीन हिरो आहेत.”

परेश रावल यांनी दिलेलं हे उत्तर आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहेत. त्यांच्या या उत्तरामुळे ते पुन्हा चित्रपटात परतणार आहेत की काय? अशा शक्यता सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये वर्तवल्या जात आहेत. ‘हेरा फेरी ३’ मधून परेश यांनी एक्झिटची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटासंबंधित काही रक्कमही निर्मात्यांना परत केली. मग या चित्रपटाच्या हक्कांवरून चर्चा झाल्या होत्या.

तसंच काही दिवसांपुर्वी परेश यांनी मी मुख्य नायक असूनही मला बाजूला करण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अक्षय कुमारनेही काही दिवसांपुर्वी ‘हेरा फेरी ३’बद्दलचा निर्णय न्यायालय घेईल असं म्हटलं होतं. अशातच आता त्यांनी ‘हेरा फेरी’मध्ये तीन हिरो असल्याचं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, ‘हेरा फेरी’च्या दोन्ही भागांच्या यशामागे अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाची जादू आहे. हीच जादू ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागातही अनुभवता यावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. म्हणूनच चाहते पुन्हा-पुन्हा परेश रावल यांना ‘हेरा फेरी ३’ मध्ये परतण्याची विनंती करत आहेत.