Parineeti Chopra & Raghav Chadha Blessed With Baby Boy : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार राघव चड्ढा आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या जोडप्याने दिवाळीच्या मुहूर्तावर आमच्या घरी गोंडस मुलाचं आगमन झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.
ऑगस्टमध्ये परिणीती व राघव यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना ते लवकरच आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. अभिनेत्रीने एका केकवर १+१=३ असं कॅप्शन आणि त्याखाली चिमुकल्या पायांचे ठसे असलेला फोटो शेअर केला होता. आता दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्रीच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालेलं आहे.
राघव चड्ढा पोस्ट शेअर करत म्हणतात, “आमच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालेलं आहे. खरंच यापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे आठवत नाहीये…त्याच्या येण्याने आयुष्य खऱ्या अर्थाने परिपूर्ण झालंय. आधी आम्ही दोघं एकमेकांसाठी होतो आणि आता आमच्याकडे सर्वकाही आहे.”
दरम्यान, अभिनेत्री परिणीती चोप्रा व राघव चड्ढांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. उदयपूरमध्ये यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता.
या दोघांची पहिली भेट लंडन येथे झाली होती. राघव यांना राजकीय कारकिर्दीसाठी तर परिणीतीला अभिनय क्षेत्रातील कामासाठी ब्रिटिश काउन्सिलकडून पुरस्कार मिळणार होता. यानंतर दोघंही दिल्लीत भेटले. त्यांच्या प्रेम कहाणीला २०२२ पासून खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. परिणीतीच्या ‘चमकीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं अन् दोघांनी सप्टेंबर २०२३ मध्ये थाटामाटात लग्न केलं.