अभिनेत्री पूजा बेदी आणि तिचा पती फरहान फर्निचरवाला यांचा २२ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. फरहानने पुन्हा लग्न केलं, तर पूजाचेही रिलेशनशिप राहिले. फरहान व पूजा वेगळे झाले असले तरी त्यांच्यात जवळचं नातं आहे. ते मुलांचा सांभाळ एकत्र करतात. पूजा फरहानला ‘बेस्ट फ्रेंड’ म्हणते. फरहानने घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं, तेव्हा त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्साही होते असंही पूजा बेदीने नमूद केलं.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, “आमच्या नात्याचे असे अनेक पैलू होते ज्यामुळे आमचं नातं टिकलं नाही आणि टिकणारही नव्हतंच. त्यामुळे नेहमी एकमेकांचा आदर करायचा आणि प्रेमाने राहायचं हे आम्ही ठरवलं होतं. आम्हाला दोन सुंदर मुलं आहेत आणि आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. मला त्याची सध्याची पत्नी लैला आवडते. मी तिला ज्युनियर केजीपासून ओळखते. तो तिच्याशी लग्न करतोय, हे पाहून मला खूप आनंद झाला. कारण ती माझ्या मुलांशी खूप चांगली वागेल, माझी मुलं तिला खूप आवडतात हे मला माहित होतं. त्यांच्या लग्नामुळे मी पती गमावला असं नाही, तर मला लैला भेटली. त्यांचा मुलगा झान भेटला. आमचं कुटुंब मोठं झालं. खरं तर यासाठी तुमचं मन मोकळं असावं लागतं.” फरहानचे कुटुंबीय व पूजा, तिची मुलं अनेकदा एकत्र सण साजरे करतात, तसेच जेवायला एकत्र जातात.
फरहान खूप चांगला बाबा आहे – पूजा बेदी
नातं टिकणार नसल्याचं लक्षात आल्यावर एकमेकांचे तोंड बघावे वाटणार नाही, अशी कटुता नात्यात येण्यापूर्वीच फरहान व पूजाने विभक्त व्हायचा निर्णय घेतला. पूजाने तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकटीने केला. तिची लेक अलाया पाच वर्षांची असताना त्यांचा घटस्फोट झाला. “फरहान खूप चांगला बाबा आहे आणि तो त्याच्या मुलांवर प्रेम करतो. मुलं वीकेंडला त्याच्याबरोबर असायची आणि वेळ घालवायची. बाकी दिवस मी त्यांचा सांभाळ करायचे,” असं पूजा बेदीने सांगितलं.
आंतरधर्मीय लग्न केल्यावर पूजाने काम करणं थांबवलं
अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीमध्ये हळूहळू स्थान मिळवत असताना, ती प्रसिद्धीपासून दूर का गेली? असं पूजाला विचारण्यात आलं. “मी एका रूढीवादी मुस्लीम कुटुंबातून आलेल्या फरहानशी लग्न केलं. त्याचे कुटुंब सेटवर जाणारी सून स्वीकारू शकतील, हे शक्यच व्हतं. त्या काळी चित्रपटसृष्टीबद्दल खूप गॉसिप व्हायची. एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्रींची नावं हिरोंशी जोडली जायची, असं सगळं चालू असायचं. त्यामुळे मला वाटलं नाही की ते चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सूनेला स्वीकारतील. त्याकाळी अभिनेत्रींबद्दल असं होतं की लग्न झाल्यावर त्या सिनेमे करायचं थांबवायच्या. तेव्हा आजसारखी परिस्थिती नव्हती. सासरच्या लोकांसाठी ‘सेक्सी सून’ किंवा ‘सेक्स-सिम्बॉल सून’ सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट होती.”
पूजा बेदी पुढे म्हणाली, “मी खूप विचार केला आणि ठरवलं की मी जे करेन ते चांगलं आणि आदरपूर्वक करेन. मला कोणत्याही कुटुंबात जाऊन तिथल्या लोकांना अस्वस्थ करायचं नाही. म्हणून, एकतर लग्न करायचं नाही किंवा करायचं असेल तर बाकी गोष्टी सोडायच्या. त्यानंतर मी ज्या चित्रपटांसाठी तारखा दिलेल्या होत्या, त्या सर्वांची सायनिंग अमाउंट मी परत केली. माझे कामसूत्र कँपेन रिन्यूअलसाठी आले होते, पण मी त्यासाठीही नकार दिला. त्यांनी मला आधी दिलेल्या रकमेच्या आठपट मानधन ऑफर केली होती.”