Prateik Babbar developed hate for Parents : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीकने वडिलांचं आडनाव हटवलं आहे. प्रतीक बब्बरने त्याचं नाव बदलून ‘प्रतीक स्मिता पाटील’ असं केलं आहे. आता प्रतीक त्याच्या आईचं नाव लावताना, आईबद्दल बोलताना दिसत असला तरी आधी मात्र तिच्याबद्दल व वडिलांबद्दल द्वेष होता असं त्याने सांगितलं.

प्रतीकच्या जन्मानंतर दोन आठवड्यांनी स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला होता. प्रतीकला स्मिता पाटील यांच्या आई-वडिलांनी सांभाळलं. प्रतीक बराच मोठा झाल्यावर वडील राज बब्बर यांच्या संपर्कात आला. पण सुरुवातीच्या काळात आईबरोबर सारखी तुलना व्हायची, त्याचा फार त्रास होत नव्हता, असं प्रतीक म्हणाला.

आई-वडिलांबद्दल द्वेष निर्माण झाला – प्रतीक बब्बर

स्मिता पाटील यांचा मुलगा असणं हे आता स्वीकारलं असलं तरी पूर्वी ते इतकं सोपं नव्हतं, असं प्रतीकने बॉलीवूड बबलशी बोलताना सांगितलं. “माझ्या मनात तिच्याबद्दल आणि माझ्या वडिलांबद्दल, दोघांबद्दलही द्वेष निर्माण झाला. मी मोठा होत असताना दोघेही नव्हते, त्यामुळे मला सगळं खूप वेगळं वाटायचं. लोक मला वेगळ्या पद्धतीने वागवायचे, ते माझ्यावर दया दाखवायचे. त्यामुळे मला माझ्या आई-वडिलांशी संबंधच ठेवायचे नव्हते. जेव्हा लोक माझी तुलना आईशी करायचे, त्यावेळी मी म्हणायचो, राहुद्या.. मला याचा त्रास होत नाही, माझ्यावर याचा परिणाम होत नाही, मला फरक पडत नाही. लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या,” असं प्रतीक म्हणाला.

प्रतीकला पडायचे प्रश्न

आईबरोबर वेळच घालवला नसल्याने तिच्यावर प्रेम आहे की नाही या असंमंजसपणात वाढल्याचं प्रतीकने सांगितलं. “मी स्वतःशी भावनिकरित्या भांडत होतो. माझं तिच्यावर प्रेम आहे का? माझं त्यांच्यावर (आई-वडील) प्रेम आहे का? मला खरंच त्यांचा मुलगा व्हायचंय का? असे प्रश्न मला पडायचे,” असं प्रतीक म्हणाला. एका विशिष्ट वयापर्यंत पालकांबद्दल द्वेष वाटत होता, असं म्हणत प्रतीकने स्पष्टीकरण दिलं. “बंडखोरीचं द्वेषात रुपांतर होऊ शकतं. जेव्हा तुम्ही दुखावले असता, आघात सहन केलेले असतात, काही गोष्टी बरोबर नाहीत हे तुम्हाला माहीत असतं अशावेळी तुमच्या पालकांबद्दल मनात द्वेष वाटणं सोपं आहे,” असं प्रतीकने नमूद केलं.

वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल प्रतीकला विचारण्यात आलं. कधी राज बब्बर यांच्याशी मनमोकळेपणाने बोललास का, तुला काय वाटतं ते सांगितलंस का, असं विचारल्यावर प्रतीकने नकार दिला. “कधीच नाही. माझं त्यांच्याशी तसं नातं नव्हतंच. आम्ही नातं सुधारण्याचा प्रयत्न केला, एक बंध जोडण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांच्याशी मनातलं शेअर करू शकलो नाही. आणि ते पूर्णपणे ठिके. परिस्थितीमुळे असं झालं असावं,” असं प्रतीक म्हणाला.

प्रतीक बब्बरने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं, पण या लग्नाला त्याने वडील राज बब्बर तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणत्याच सदस्याला निमंत्रण दिलं नव्हतं.