राज बब्बर व स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीकने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. प्रतीकने त्याचं ड्रग्जचं व्यसन, त्यामुळे शाळा व कॉलेजमधून काढल्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच लहानपणी आई-वडिलांबद्दल मनात द्वेष निर्माण झाला होता, असं नमूद केलं. आता प्रतीकने सांगितलं की सुरुवातीच्या काळात लोक त्याला ‘गे’ समजायचे.

प्रतीक स्मिता पाटीलने वैयक्तिक आयुष्यातील काही अनुभव सांगितले. प्रतीकने खुलासा केला की त्याच्या करिअरच्या सुरुवातीला बॉलीवूडमधील लोक त्याला समलैंगिक समजत होते. तो २०-२२ वर्षांचा असताना इंडस्ट्रीतील ‘गे’ लोकांकडून त्याला खूप अटेंशन मिळायचं.

बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत, प्रतीकने त्याच्या पालकांशी असलेल्या नात्याबद्दल आणि इंडस्ट्रीमधील त्याच्या संघर्षांबद्दल सांगितलं. प्रतीकच्या मते, लोक त्याला समलैंगिक समजत होते आणि बॉलीवूडमध्ये समलैंगिक असणं हा टॅबू आहे. प्रत्येकाच्या आवडी-निवडी व सेक्शुअल ओरिएंटशनचा आदर करतो, असं म्हणत स्वतः समलैंगिक नसल्याचं प्रतीकने स्पष्ट केलं.

लोकांना वाटायचं मी समलिंगी आहे – प्रतीक

२०१७ मध्ये ‘मी टू’ चळवळ सुरू झाल्यापासून इंडस्ट्रीत अनेक गोष्टी बदलल्या आहेत, त्यापूर्वी लोक त्याला प्रपोज करायचे, असं प्रतीकने नमूद केलं. “विशीत असताना मला मुलांकडून खूप अटेंशन मिळायचं. मी टू आल्याने लोक थोडे घाबरतात. पूर्वी सगळ्या गोष्टी उघडपणे घडायच्या, लोक इकडे तिकडे हात लावायचे, त्यामुळे गोष्टी खूप हुशारीने हाताळाव्या लागत होत्या. समलिंगी मुलांना वाटायचं की मीही समलिंगी आहे आणि उपलब्ध आहे,” असं प्रतीक म्हणाला.

अभिनेता प्रतीक स्मिता पाटील (फोटो – इन्स्टाग्राम)

प्रतीकला वाटतं की त्याच्या ‘कोबाल्ट ब्लू’ चित्रपटामुळे तो समलैंगिक असल्याच्या अफवांना खतपाणी घातलं. या चित्रपटातील त्याची भूमिका पाहून लोकांना तो खऱ्या आयुष्यात समलैंगिक आहे असं वाटू लागलं. हॉलीवूड कलाकार त्यांच्या लैंगिकतेबद्दल खूप उघडपणे बोलतात, पण बॉलीवूडमध्ये असं नाही, इथे समलैंगिक असणं टॅबू आहे, असं मत प्रतीक स्मिता पाटीलने व्यक्त केलं.