अभिनेता प्रतीक स्मिता पाटीलने या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. या लग्नात प्रतीकने त्याचे वडील, ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि त्यांचे सावत्र भाऊ आर्या बब्बर व जुही बब्बर यांना निमंत्रण दिलं नव्हतं. प्रतीकने त्यांना का बोलावलं नाही, याबद्दल खूप चर्चा झाली होती. अखेर प्रतीकने कारणाचा खुलासा केला आहे. राज बब्बर यांची पहिली पत्नी नादिरामुळे बब्बर कुटुंबाला लग्नात बोलावलं नसल्याचं त्याने सांगितलं.
टाईम्स नाऊशी बोलताना प्रतीक म्हणाला, “माझ्या वडिलांची पत्नी (नादिरा) आणि माझ्या आईचे संबंध खूप गुंतागुंतीचे होते. तुम्ही ३८-४० वर्षांपूर्वीच्या गोष्टी शोधून काढल्या तर कळेल की माझ्या आईबद्दल खूप गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. मी माझे वडील व त्यांच्या कुटुंबासाठी दुसरा कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत होतो. पण त्यांच्यात जे काही घडलं ते माहीत असताना मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला त्या घरात बोलावणं मला बरोबर वाटलं नाही.” प्रतीकने आई स्मिता पाटीलच्या घरात प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं.
आईच्या सन्मानासाठी घेतलेला निर्णय – प्रतीक
हा निर्णय त्याच्या आईच्या सन्मानासाठी घेतला होता, असं प्रतीकने नमूद केलं. “मला वाईट वाटतंय की माझे वडील आणि त्यांची पत्नी तिथे येऊ शकले नाहीत, माझ्या आईने मला वाढण्यासाठी आणि एकटी आई म्हणून आयुष्य जगायला ते घर घेतलं होतं. तिला माझ्याबरोबर सिंगल मदर म्हणून त्या घरात राहायचं होतं, मला मोठं करायचं होतं. मला माफ करा. पण त्या घरात लग्न करण्याचा मी आणि माझ्या पत्नीने घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय होता. तो निर्णय कोणालाही नाकारण्याचा नव्हता. तो माझ्या आईचा आणि तिच्या इच्छांचा आदर करण्याबद्दल होता,” असं प्रतीक म्हणाला.
राज बब्बर आणि त्यांचा मुलगा आर्यने लग्नाचं निमंत्रण न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. आर्यने प्रतीकची खिल्लीही उडवली होती. त्याबद्दल प्रतीक म्हणाला, “लोक खूप लवकर प्रतिक्रिया देतात. घाईत निर्णय घेतात, एखाद्या गोष्टीबद्दल बरंच काही बोलतात. ते बोलणं अजिबात चांगलं नव्हतं. ती गोष्ट अजूनही खटकतेय.”
प्रतीकने कबूल केलं लग्नात न बोलावण्याच्या त्याच्या निर्णयामुळे त्याचे वडील आणि सावत्र भावंडांबरोबरच्या नात्यात दुरावा आला. “आम्ही जे केलं तेच योग्य होतं. आता परिस्थिती वेगळी आहे आणि त्यांच्या बाजूने आणखी गुंतागुंत वाढली आहे. मी अजूनही तसाच आहे,” असं प्रतीक म्हणाला.
राज बब्बर व स्मिता पाटील यांचं नातं
राज बब्बर यांनी नादिरा बब्बरशी पहिलं लग्न केलं होतं आणि त्यांना आर्य व जुही ही दोन अपत्ये होती. १९८२ मध्ये ‘भीगी पलकें’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले. त्यांनी नादिराला सोडून गुप्तपणे स्मिताशी लग्न केलं. नोव्हेंबर १९८६ मध्ये स्मिता यांनी प्रतीकला जन्म दिला. त्यानंतर दोन आठवड्यांनी प्रसूतीसंदर्भातील गुंतागुंतीमुळे स्मिता पाटील यांचे निधन झाले. स्मिताच्या मृत्यूनंतर, राज बब्बर पुन्हा नादिराकडे परत गेले.