हिंदी सिनेसृष्टीचा लोकप्रिय सुपरस्टार सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. सलमान खानच्या या चित्रपटाची दोन उत्तम गाणी आणि धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या पहिल्याच दिवशी चित्रपटाबरोबर याचा टीझर सादर करण्यात आला होता. आता सलमानचा हा चित्रपटही ‘पठाण’च्या पावलाव पाऊल टाकून चालत असल्याचं म्हंटलं जात आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी जी शक्कल लढवली होती तीच या चित्रपटाच्या बाबतीत लढवली जात असल्याची चर्चा आहे. ‘पठाण’च्या ट्रेलरआधी त्याचा एक टीझर आणि २ जबरदस्त गाणी सादर करण्यात आली होती त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. ही गोष्ट चित्रपटाच्या पथ्यावरच पडली. आता हीच शक्कल ‘किसी का भाई की जान’च्या निर्मात्यांनी लढवली आहे.
आणखी वाचा : तापसी पन्नूने सांगितला शाहरुख खानच्या घरच्या पार्टीतील ‘तो’ किस्सा; मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीचा खुलासा
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा ट्रेलर अद्याप आलेला नाही आणि ‘पठाण’ चित्रपटाप्रमाणेच ‘किसी का भाई किसी की जान’ची दोन गाणी आणि टीझर आधीच प्रदर्शित झाला आहे. आता सलमान खानचा हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’प्रमाणे यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची मनं आधीच जिंकली आहेत, शिवाय दोन्ही गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
सलमानच्या ‘टायगर ३’प्रमाणेच त्याच्या या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील सलमानचा लूकसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ रोजी झळकणार आहे. भाईजानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत.