हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांमध्ये कामाबद्दलची असुरक्षिततेची भावना दिसून येते, त्यामुळे ते कोणतीच जोखीम घेत नाहीत; असं वक्तव्य अभिनेता आर माधवनने केलं. हॉलीवूडमध्ये स्टार्स आधीच्या कामातून इतका पैसा कमवतात की ते जोखीम घेण्यासाठी सक्षम होतात. भारतात हॉलीवूडसारखा ‘Residuals’ (चित्रपटाच्या कमाईतून मिळणारं मानधन) हा प्रकार असतात तर ३ इडियट्स, रंग दे बसंती आणि तनु वेड्स मनू हे फक्त तीन हिट चित्रपट केल्यानंतर माझ्या पुढच्या पिढ्या बसून खातील, इतका पैसा असता, असं माधवन म्हणाला.
शाहरुख खान त्याच्या चित्रपटातून जास्त नफा मिळवण्यासाठी निर्माता झाला, हा निर्णय योग्य होता का? असं आर माधवनला विचारण्यात आलं. अक्षय राठीला दिलेल्या मुलाखतीत माधवनने सांगितलं की, याबाबतीत प्रत्येकाचा दृष्टिकोन सारखा असू शकत नाही. चित्रपट सृष्टीतील ‘वरच्या स्तरातील’ कलाकार हे करू शकतात, परंतु खालच्या स्तरातील लोकांना त्यांच्याइतकी आर्थिक सुरक्षितता नसते. “जर तुम्ही दोनअंकी पगार मिळवत असाल तर त्यासाठी नियम वेगळे आहेत, कारण त्यांनी त्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे,” असं माधवन म्हणाला.
बॉलीवूडमधील मानधनाबद्दल माधवन म्हणाला…
स्टार्सना एका विशिष्ट जीवनशैलीची सवय होते, पण फार कमी लोकांना त्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू नये, याची जाणीव असते, असं माधवनला वाटतं. “त्यांचे (अ-लिस्ट स्टार्सचे) मानधन इतके आहेत, की ते आयुष्यभर अशी जीवनशैली जगू शकतात. जर मी हॉलीवूड अभिनेता असतो आणि मी करिअरमध्ये जितके हिट चित्रपट केले, तितकेच केले असतील तर एखाद्या जोखीम असलेला प्रोजेक्ट घेण्यापूर्वी मी विचार केला असता का? मी लगेच होकार दिला असता. कारण मला माहित आहे की माझ्या येणाऱ्या पिढ्या त्या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या मानधनात आरामात जगू शकतील,” असं आर माधवन म्हणाला.
माधवन पुढे म्हणाला, “पण जेव्हा तुम्हाला माहित असते की पेन्शन नाही, पण तुम्ही एक विशिष्ट जीवनशैली तयार केली आहे, ती तुम्हाला टिकवावी लागेल, तेव्हा तुम्ही विचार करता की ‘पैसे तर घे, उद्या मिळतील की नाही मिळणार, कुणास ठाऊक’.”
माधवन म्हणाला की जर तो हॉलीवूड स्टार असता तर तो अजूनही त्याच्या काही हिट चित्रपटांसाठी पैसे कमवत असता. “असं म्हणतात की अमरीश पुरी यांना त्यांनी केलेल्या स्टीव्हन स्पीलबर्गच्या चित्रपटासाठी अजूनही पैसे मिळतात. जर मी हॉलीवूड अभिनेता असतो, तर माझ्या येणाऱ्या पिढ्यांना जगण्यासाठी ३ इडियट्स, रंग दे बसंती आणि तनु वेड्स मनु हे दोन किंवा तीन चित्रपट पुरेसे असतील,” असं मत माधवनने मांडलं.
Residuals म्हणजे काय?
Residuals हे रॉयल्टीसारखे असतात. ते एखाद्या चित्रपट किंवा शोमध्ये काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिले जातात. जेव्हा त्या चित्रपटातून किंवा शोमधून कमाई होते, तेव्हा ते दिले जातात. मग ती कमाई टीव्ही, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म किंवा इतर कुठल्याही मार्गांनी होत असो.