R Madhavan Talks about Ranveer Singh : अभिनेता आर माधवन हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांने त्याच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आर माधवनचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच त्याचा ‘आप जैसा कोई’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. आर माधवन चित्रपट तसेच इंडस्ट्रीतील कलाकारांबद्दल आपली मतं मांडत असतो. आता त्याने बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

आर माधवन लवकरच ‘धुरंदर’ चित्रपटात झळकणार आहे. आदित्य धरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. या सिनेमात आर माधवन व रणवीर सिंह पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आर माधवनने नुकतच रणवीर सिंहबद्दल वक्तव्य केलं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार आर माधवन रणवीर सिंहबद्दल म्हणाला, “मला वाटत नाही की, रणवीर सिंहला कधी नकार मिळाले असतील. काही फ्लॉप चित्रपट कलाकाराचं करिअर संपवू शकत नाही. तो एक चांगला अभिनेता आहे पण कलाकारांबद्दल नको त्या गोष्टी बोलणं, छापणं माध्यमांना चांगलंच जमतं”.

आर माधवन पुढे म्हणाला, “जर तुम्ही हॉलीवूडमधील टॉम क्रूझ व टॉम हँक्स या कलाकारांना पाहिलं तर त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ५०-६० चित्रपट केलेले नाहीत. त्यांनी जेमतेम १४-१५ चित्रपटांमध्ये काम केलेलं असतं. तर दिग्गज कलाकारांनीही १५ पेक्षा अधिक चित्रपट केलेले नसतात. चांगले चित्रपट याच गतीने बनवले जातात आणि आपल्याकडे आपण तीन महिने जरी काम केलं नाही तरी आपली प्रसिद्धी कमी होईल असं वाटतं. मी व रणवीर आम्ही दोघेही अशा गोष्टींचा विचार करत नाही”.

आर माधवन पुढे म्हणाला, “आताचा काळ वेगळा आहे. आम्हाला प्रेक्षकांची मनं जिंकण्याकरता प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घ्यावी लागते कारण आताचा प्रेक्षकवर्ग सुजाण आहेत. त्यामुळे कधी कुठल्या गोष्टीसाठी उशीर झाला तर ते थेट प्रश्न विचारतात”.

दरम्यान, रणवीर सिंहच्या ‘धुरंदर’बद्दल बोलायचं झालं तर ५ डिसेंबर ला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आर माधवन, रणवीर सिंह यांच्यासह अभिनेता संजय दत्त, अक्षय खन्ना, व अर्जुन रामपाल हे कलाकार झळकणार आहेत.