अभिनेता राहुल बोस जवळजवळ तीन दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तो आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. राहुलने अनेक चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका केल्या. पण त्याचं करिअर फार यशस्वी राहिलं नाही. राहुलने आता लहानपणी त्याचं संगोपन कशा वातावरणात झालं, याचा खुलासा केला आहे.

राहुल एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की त्याच्या घरात आई-वडील दोघेही अगदी वेगळ्या विचारांचे होते. सामान्य घरात जी भूमिका आई पार पाडते ती राहुलच्या घरात वडिलांनी पार पाडली, तर वडिलांची भूमिका आईने पार पडली. कारण राहुलचे वडील चांगले कपडे घालायला आणि प्रेझेंटेबल राहायला सांगायचे. तर त्याची आई करिअरवर लक्ष केंद्रित करायला आणि वेगवेगळे खेळ खेळायला सांगायची.

“माझी आई कधीच स्वयंपाक करत नव्हती, घरी नेहमी माझे वडील स्वयंपाक करायचे. माझी आई मला ५ वर्षे दररोज मारायची. मी इतका रिकामटेकडा होतो की आईने मारलं त्याची मला मदतच झाली. आता खरंच कोणी असं सांगणार नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा, त्या काळी मी असाच होतो. आईने मला रग्बी आणि बॉक्स खेळायला भाग पाडलं,” असं राहुल बोस म्हणाला.

वडिलांना वाटत होतं मी क्रिकेट खेळावं – राहुल

कठीण खेळांमध्ये राहुलला रस होता, त्याबद्दल वडिलांची प्रतिक्रिया काय होती, असं त्याला विचारण्यात आलं. “मी शाळेत बॉक्सिंग करत होतो आणि माझे वडील घाबरले होते. ते मला टोपी घालायला सांगायचे जेणेकरून उन्हात मी काळवंडणार नाही. मी क्रिकेट खेळावं आणि एक चांगला सज्जन माणूस व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मला रग्बी खेळताना पाहिलं आणि त्यानंतर ते कधी मैदानात आले असतील तरी त्यांनी खेळताना पाहिलं नाही,” असं राहुल म्हणाला.

राहुलने थोडक्यात त्याच्या आई-वडिलांच्या भूमिकेबद्दल सांगितलं. “मी अशा वडिलांचा मुलगा आहे जे लग्नात आपण काय घालावं, हे विचारायचे. आणि मी अशा आईचा मुलगा आहे जी मी करिअरमध्ये काय करावं हे विचारायची. त्यांच्या भूमिका अगदी उलट होत्या,” असं राहुलने नमूद केलं.

राहुल बोस हा ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’, ‘आय अॅम’, बुलबुल, ‘कालपुरुष’ यासारख्या चित्रपटांमधील त्याच्या विविध भूमिकासांठी ओळखला जातो. तो शेवटचा ‘बर्लिन’ चित्रपटात दिसला होता.