मधुबाला, गीता बाली, माला सिन्हा आणि राज कपूर यांच्यातला समान धागा म्हणजे या सगळ्यांना दिग्दर्शक केदार शर्मा यांनी आपल्या चित्रपटांमधून संधी दिली होती. केदार शर्मा यांनी ही आठवण सांगितली की राज कपूर यांना कसं त्यांनी नीलकमल या चित्रपटात कास्ट केलं होतं. केदार शर्मा यांनी सांगितलं की राज कपूर हे त्यांच्या तारुण्यात रेड लाइट एरियामध्ये जाऊ लागले होते. त्यानंतर पृथ्वीराज कपूर यांनी राज कपूर यांना ताळ्यावर आण असं सांगत केदार शर्मा यांना ती जबाबदारी दिली होती. राज कपूर नंतर स्टार झाले. त्यांनी गीता बालीसह काम करण्यास नकार कसा दिला काय घडलं होतं ते केदार शर्मा यांनी सांगितलं.

गीता बाली यांच्याबाबत काय म्हणाले केदार शर्मा?

गीता बाली यांना त्यावेळी १३ हजार रुपये मानधन देऊन केदार शर्मा यांनी चित्रपटात घेतलं होतं. गीता बाली या हिट झाल्यानंतर त्यांच्या चित्रपटांसाठी ५० हजार ते ६० हजार रुपये मानधन घ्यायच्या. मात्र त्यांचे चित्रपट चालणं बंद झाल्यानंतर त्यांच्यावर कठीण परिस्थिती ओढवली होती. अत्यंत हिंमतीने गीता बाली या केदार शर्मा यांच्याकडे आल्या. त्यांनी काम मागितलं. त्यांना इतर दिग्दर्शक ६ हजार रुपयांमध्येही घेण्यास तयार नव्हते. त्या काळात केदार शर्मा यांनी त्यांना १३ हजार रुपये मानधन दिलं. केदार शर्मा यांनी ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

गीता बाली स्टार झाली तेव्हा मला विसरली-शर्मा

केदार शर्मा या मुलाखतीत म्हणाले, गीता बाली त्या काळी स्टार होती. ती खूप मेहनती होती. तिच्याबरोबर काम करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. मात्र गीता जेव्हा स्टार पदावर पोहचली तेव्हा ती मला सोयीस्करपणे विसरली. मी तिच्या अशा वागण्याने दुःखी झालो होतो. हळूहळू मी ते सगळं विसरलो. एक दिवस असाही आला होता जेव्हा गीता बाली तिच्या आईसह मला भेटायला आली. ती म्हणाली माझे चित्रपट चालत नाहीत, मला कुणी ६ हजारही मानधन द्यायला तयार नाही. त्या काळात मी तिला चित्रपट दिला आणि १३ हजारांचं मानधनही दिलं. असं केदार शर्मा म्हणाले.

बावरे नैन सिनेमाचा किस्सा काय?

मला खरंतर सुरुवातीला गीता बालीचा राग आला होता, मी तिला हाकलून देण्याच्या विचारांत होतो. पण नंतर मी तिची परिस्थिती पाहिली आणि तिची मला दया आली. मला वाटलं की गीता बालीने जी चूक केली ती आपण करायला नको, शिवाय गीताला तिची चूक समजून चुकली होती. मी तिला बावरे नैन चित्रपटात घेतलं. मला माहीत होतं की तिच्या एकटीच्या नावावर चित्रपट चालणार नाही किंवा विकलाही जाणार नाही. मग मी राज कपूर यांच्याकडे गेलो. मी राज कपूर यांना सांगितलं की मी तुम्हाला दुसरे निर्माते किंवा दिग्दर्शक देतात तेवढं मानधन देऊ शकणार नाही पण तुम्ही माझा चित्रपट करावा. राज कपूर यांनी माझी अट मान्य केली पण त्याचवेळी मला विचारलं माझ्याबरोबर अभिनेत्री म्हणून कुणाला घेत आहात? त्यावर मी उत्तर दिलं गीता बाली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

राज कपूर, गीता बाली, शम्मी कपूर यांचं १९६१ मधलं छायाचित्र (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

माझ्या स्टँडर्डची मुलगी तर चित्रपटात घ्या, राज कपूर काय म्हणाले होते?

केदार शर्मा पुढे म्हणाले राज कपूर यांनी जेव्हा गीता बाली हे नाव ऐकलं तेव्हा ते मला म्हणाले, सर हे काय करत आहात? माझ्या स्टँडर्डची अभिनेत्री तरी घ्या चित्रपटात. त्यावर केदार शर्मा म्हणाले मी तिला संधी देऊ इच्छितो. लगेच राज कपूर यांनी अट घातली की ठीक आहे ती एकही संवाद म्हणणार नाही असं पाहा. मात्र केदार शर्मा म्हणाले की गीता बालीने असा अभिनय केला की राज कपूर यांना काही बोलताच आलं नाही. त्यानंतर राज कपूर यांचे बंधू शम्मी कपूर यांच्याशी गीताने लग्न केलं. त्यानंतर तिने अभिनय सोडून दिला. पण वयाच्या ३४ व्या वर्षीच तिचा मृत्यू झाला असंही दिग्दर्शक केदार शर्मा यांनी सांगितलं.