राजेश खन्ना भारतीय सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. त्यांच्या चित्रपटांचा विशेष चाहता वर्ग राहिलाय. त्याकाळी राजेश खन्ना यांची महिलांमध्ये खूप क्रेझ होती. त्यांची एक झलक बघायला मिळावी, यासाठी चाहत्यांची गर्दी व्हायची. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे करणाऱ्या राजेश खन्नांचं वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं.

राजेश खन्ना यांचं अंजू महेंद्रूबरोबर अफेयर होतं. इतकंच नाही तर १९६६ ते १९७२ या काळात ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतरही ते वेगळे झाले. वेगळे होण्याचं एक कारण राजे खन्ना यांचं अधिकार गाजवणं होतं, असंही म्हटलं जातं.

अंजू महेंद्रू यांना त्यांचे जवळचे मित्र, अभिनेते संजीव कुमार यांनी राजेश खन्नांच्या स्वभावाबद्दल सावध केलं होतं. राजेश खन्नांबरोबर तू आनंदी राहू शकणार नाहीस आणि ते तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही असं संजीव यांनी अंजूंना म्हटलं होतं. शेवटी तेच घडलं. ब्रेकअपनंतर वर्षभराने राजेश खन्ना यांनी त्यांच्याहून निम्म्या वयाच्या डिंपल कपाडियाशी लग्न केलं. आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांची वरात अंजू महेंद्रू याच्या घरासमोरून गेली होती. त्यावेळी अंजू व राजेश यांच्या नात्यात कटुता आली होती. पण हे नातं तुटल्याने अंजू दुःखी नव्हत्या, कारण संजीव कुमार यांनी त्यांना आधीच राजेश खन्नांबद्दल इशारा दिला होता.

राजेश खन्ना व डिंपल कपाडियांचं प्रेम

राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची पहिली भेट अहमदाबादला एका इव्हेंटला जाताना झाली होती. त्यांच्या भेटीची आठवण करून देताना डिंपल यांनी सांगितलेलं, “मी हुशारीने त्यांना म्हणालेले, ‘तिथे खूप गर्दी होणार आहे. तुम्ही माझा हात धराल का?’ ते म्हणाले, ‘हो, नक्कीच.’ मी म्हटलं, ‘नेहमी?’ आणि नंतर जे घडलं ते सर्वांनी पाहिलं.”

डिंपल कपाडिया व राजेश खन्ना यांचे लग्न

पहिल्या भेटीनंतर एका आठवड्यात दोघांनी लग्न करायचं ठरवलं. मार्च १९७३ साली डिंपल कपाडिया व राजेश खन्ना यांनी लग्न केलं. राजेश खन्ना त्यावेळी ३१ वर्षांचे, तर डिंपल कपाडिया १६ वर्षांच्या होत्या. दोघांच्या वयातील अंतरामुळे या लग्नाची खूप चर्चा झाली होती. ‘बॉबी’ सिनेमा हिट झाल्याने डिंपल यांना सिनेमाच्या खूप ऑफर येत होत्या, पण राजेश खन्नांनी लग्नानंतर त्यांना काम करू दिलं नाही. त्यांना दोन मुली झाल्या. काही वर्षे एकत्र राहिल्यानंतर या दोघांच्या नात्यात चढ-उतार येऊ लागले. अखेर १९८२ साली ते वेगळे झाले.

राजेश खन्ना यांची संपत्ती

डिंपल कपाडियांनी मुली ट्विंकल व रिंकी यांना घेऊन ‘आशीर्वाद’ बंगला सोडला. त्यांनी राजेश खन्ना यांना घटस्फोट दिला नाही, पण त्या त्यांच्याबरोबर राहिल्याही नाही. डिंपल घटस्फोट द्यायला तयार नसल्याचं राजेश खन्ना स्वतः म्हणाले होते. राजेश खन्ना यांचे २०१२ मध्ये निधन झाले. तेव्हा त्यांची संपत्ती ६०० कोटी रुपयांची होती.