बॉलीवूड व अंडरवर्ल्डच्या संबंधाबाबत अनेकदा बोलले जाते. प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन(Rakesh Roshan) यांच्यावर एकदा गोळीबार झाला होता. त्याच्या संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. आता द रोशन्स या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॉक्युमेंटरीमध्येदेखील त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. हृतिक रोशनचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ हा चांगलाच गाजला होता. पण, हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एक आठवड्यानंतर चित्रपटाचे निर्माते व हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांच्यावर त्यांच्या मुंबईतील ऑफिसबाहेर गोळीबार करण्यात आला होता. हा हल्ला अंडरवर्ल्डमधील काही लोकांनी केला होता. या हल्ल्यापूर्वी राकेश रोशन यांना त्यांच्याकडून धमक्या देण्यात आल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी मला त्यांच्या जीपमधून…

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी या घटनेबद्दल वक्तव्य केले होते. जेव्हा त्यांच्यावर गोळीबार झाला, तेव्हा त्यांना धक्का बसला होता आणि बराच वेळ गोळी लागल्याची जाणीव झाली नव्हती, असे म्हटले होते.

‘झूम’शी बोलताना राकेश रोशन यांनी म्हटलेले की गोळीबाराच्या घटनेनंतर ड्रायव्हर हा भीतीने थरथरत होता, त्यामुळे आम्ही लगेचच घटनास्थळावरून बाजूला गेलो आणि एका गल्लीत गाडी थांबवली. मी माझ्या ड्रायव्हरला शांत व्हायला सांगितले. तोपर्यंत मला गोळी लागल्याचेही लक्षात आले नव्हते. त्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनकडे निघालो. कारण- गोळीबार करणारे जवळच असतील अशी मला शंका होती. त्यामुळे त्यांना पकडले जाऊ शकते, असे वाटले.

याबद्दल अधिक बोलताना राकेश रोशन यांनी म्हटलेले की तोपर्यंत मला माझा शर्ट थोडासा ओला झाल्याचे जाणवले. पुढच्या काही क्षणातच लक्षात आले की रक्त येत आहे. म्हणून त्याठिकाणी रूमाल बांधून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. मी पोलीस स्टेशनला पोहोचलो, तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी मला त्यांच्या जीपमधून रुग्णालयात नेले. तिथे पोहोचल्यानंतर पहिला फोन मी माझे सासरे जे ओम प्रकाश यांना केला. जेणेकरून ते कुटुंबातील इतरांना कळवू शकतील आणि दुसरा फोन हृतिकला केला. तो यश चोप्रांच्या घरी होता. त्याला सांगितले की घराबाहेर जाऊ नकोस. तुझे आजोबा तुला बोलवतील, तू त्यांच्याबरोबर ये. शस्त्रक्रियेनंतर मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. कारण-मला माहित होते की जर मी घाबरलो तर परिवारातील सगळेच घाबरतील. म्हणून त्या प्रसंगाला धाडसाने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मला डिस्चार्ज मिळाल्यानंतरही मला अंडरवर्ल्डमधून फोन यायचे आणि मी त्यांच्याशी बोलायचो. कधी कधी मी त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलयचो की माझ्याबरोबर बसलेले माझे मित्र मला विचारायचे की तुला भीती वाटत नाही का? तेव्हा मी नाही म्हणायचो, अशी आठवण राकेश रोशन यांनी सांगितली.

राकेश यांनी पुढे म्हटले की या घटनेनंतरही धमक्या देणारे फोन कॉल येत राहिले. मला फोन येत असत की तुमचा मुलगा मिशन काश्मीरसाठी लोकेशनवर शूटिंग करत आहे आणि उद्या तुम्हाला एक वाईट बातमी मिळेल. मी तेव्हा म्हणत असे की मिळू दे. मी हृतिकला घाबरू नकोस असे सांगितले होते.

बॉलीवूड हंगामाशी बोलताना राकेश रोशन यांनी म्हटले होते की, अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांना त्यांनी पैसा गुंतवलेल्या एका चित्रपटात हृतिकने काम करावे अशी अपेक्षित होते. पण राकेश रोशन यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh roshan reveals after getting shot called hrithik roshan also shares after the incident continued to get calls threatening hrithik roshan nsp