Ram Kapoor Talks About Deepika Padukone 8 Hour Shift Debate : दीपिका पादुकोणची दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातील एक्झिट चर्चेचा विषय ठरली होती. दिवसाला आठ तास काम करणार, अशी अभिनेत्रीची मागणी होती; परंतु दिग्दर्शकाला ती मान्य नसल्याने अभिनेत्रीने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं जात होतं. त्यानंतर इंडस्ट्रीतील अनेकांनी याबद्दल त्यांची मतं मांडली होती. अशातच आता राम कपूरनेही याबाबत त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दीपिका पादुकोणच्या या मागणीबाबत राम कपूरने एका मुलाखतीमध्ये त्याची प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच राम कपूर त्याच्या ‘मिस्री’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आला होता. राम कपूर अनेकदा सोशल मीडियामार्फत अनेक विषयांवर त्याची मतं मांडत असतो. तसेच तो मुलाखतींमधूनही याबाबत त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतो. अशातच त्याने नुकतीच ‘फर्स्टपोस्ट’ला मुलाखत दिली आहे.
राम कपूरने या मुलाखतीमध्ये दीपिकाच्या दिवसाला आठ तास काम करण्याच्या मागणीबाबत त्याची प्रतिक्रिया देत म्हटलं, “एकदा तुम्ही यश मिळवल्यानंतर लोकांना तुमच्याबरोबर काम करायचं असतं. त्यामुळे तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी असता जिथे किती वेळ काम करायचं हे तुम्ही ठरवता. मीसुद्धा असं केलेलं आहे. टेलिव्हिजनसाठी काम करायचो तेव्हा मी ठरवायचो की, मला किती तास काम करायचं आहे.”
राम कपूर पुढे म्हणाला, “मी तेवढा नशीबवान होतो. तुम्ही जर यश मिळवलं असेल, तर तुम्ही हे ठरवू शकता की किती तास काम करायचं, कधी करायचं.” टेलिव्हिजनमधील करिअरबद्दल बोलताना अभिनेता पुढे म्हणाला, “जेव्हा मालिकांमध्ये काम करायचो तेव्हा मी सांगायचो की, मी फक्त आठ तास काम करणार. कारण- टेलिव्हिजनचं शूटिंग कधीच थांबत नाही. चार-पाच वर्षे मी महिन्यातील प्रत्येक दिवस काम करत होतो आणि आता जेव्हा मी चित्रपट किंवा ओटीटीवरील एखादा शो करतो तेव्हा अशी परिस्थिती असते जिथे मी १४ तास, १६ तास वगैरे काम केलं आहे; पण ते शूटिंग फक्त चार महिन्यांसाठीच असतं”.
राम कपूर पुढे याबाबत म्हणाला, “मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो की, मला जे करायचं आहे, ते सगळं मला करण्याची संधी मिळाली. माझ्या कुठल्याही तक्रारी नाही आहेत. या इंडस्ट्रीत काम करणं आव्हानात्मक आहे. काम करण्याचे तास खूप जास्त आहेत. प्रत्येक जण त्याच्या दृष्टीने योग्य तेच बोलत असतो. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, मी इतक्या आव्हानात्मक क्षेत्रात खूप काही कमावलं आहे. जे की खूप कठीण आहे.”