Rashmika Mandanna’s Ex Boyfriend Talked About Their Relationship : रश्मिका मंदाना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. दाक्षिणात्य सिनेमांसह तिने बॉलीवूड चित्रपटांतही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच रश्मिका सध्या चर्चेत आहे ते तिच्या व दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे.
रश्मिका व विजय यांनी नुकताच हैदराबादमध्ये साखरपुडा केला. त्यांनी याबद्दल सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट शेअर केली नसली तरी त्यांच्या साखरपुड्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. त्यानंतर विजय पहिल्यांदाच एका सार्वजनिक ठिकाणी नुकताच स्पॉट झाल्यानंतर त्याच्या हातातील अंगठीने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.
रश्मिका व विजय गेली ७ वर्षं रिलेशनशिपमध्ये होते. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी साखरपुडा केला; त्यामुळे आता ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, तुम्हाला माहीत आहे का विजयच्या आधी रश्मिका मंदानाचा तेव्हाचा बॉयफ्रेंड रक्षित शेट्टीबरोबर साखरपुडा झाला होता आणि ते दोघे लग्नही करणार होते.
रश्मिका मंदानाच्या एक्स बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया
‘नवभारत टाईम्स’च्या वृत्तानुसार रश्मिका व रक्षित यांच्यामध्ये त्यांच्या एका चित्रपटासाठी एकत्र काम करताना जवळीक निर्माण झालेली आणि त्यानंतर ३ जुलै २०१७ मध्ये त्यांनी साखरपुडा केलेला. त्यांच्या चाहत्यांना ते लग्न कधी करणार याबद्दल उत्सुकता होती, परंतु त्यांचं लग्न काही झालं नाही. सप्टेंबर २०१८ मध्ये दोघांचं लग्न होण्याआधीच मोडलं आणि दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. परंतु, यामुळेसुद्धा दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली नाही.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार रक्षितने एका मुलाखतीत “मी आणि रश्मिका आम्ही आजही संपर्कात आहोत. इंडस्ट्रीत काम करण्याचं तिचं स्वप्न होतं, जे ती हळू हळू पूर्ण करत आहे. तिने जे ठरवलेलं ते पूर्ण करण्याची क्षमात तिच्यामध्ये आहे, आपण त्यासाठी तिचं कौतुक केलं पाहिजे” असं म्हटलेलं.
दरम्यान, रश्मिका व विजय यांच्या साखरपुड्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला असून चाहते हे दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.