Rashmika Mandanna Reacts to Kannada Industry Ban: दक्षिण सिनेसृष्टीसह बॉलीवूड इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयामुळे कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. गेल्या काही दिवसांपासून तर रश्मिकाच्या नावाच्या चर्चा अधिकच होत आहेत. याचं कारण म्हणजे रश्मिकाचा विजय देवरकोंडाबरोबर झालेला साखरपुडा आणि तिचा आगामी सिनेमा ‘थम्मा.’

रश्मिका मंदानाबाबत झालेल्या चर्चांमध्ये तिला कन्नड इंडस्ट्रीमधून बॅन करण्यात आल्याचीही जोरदार चर्चा झाली होती. रश्मिकाला कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याची अफवा मध्यंतरी पसरली होती, ज्याबद्दल आता तिने मौन सोडलं आहे.

याबाबत रश्मिका म्हणते, “बाहेरच्या जगात नेमकं काय चाललंय? ते कुणालाच माहीत नसतं. आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करत नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय? ते फक्त देवालाच माहिती असतं. त्यामुळे लोक कोणाबद्दल काय बोलतात याला फारसा अर्थ नसतो. मात्र, ते आमच्या कामाबद्दल काही बोलत असतील तर आम्ही ते ऐकू. त्याबद्दल विचार करू आणि त्यावर काम करू.”

यापुढे तिनं स्पष्ट केलं की, “लोक काय विचार करतात, त्यावर एखादा कलाकार आपलं आयुष्य किंवा त्याचं काम ठरवू शकत नाही. इतरांच्या मतांनुसार कोणीही आपलं जीवन जगू शकत नाही. टीका ही अनेकदा गैरसमज किंवा अधुऱ्या माहितीमुळे होत असते.”

Good News Kannada शी बोलताना रश्मिकाला कन्नड इंडस्ट्रीने बॅन केल्याबद्दल विचारलं. त्याबाबत अभिनेत्री मोजक्या शब्दांत असं म्हणाली, “अजूनपर्यंत तरी कुणी मला बॅन केलेलं नाही”. तसंच यावेळी तिला ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’बद्दलही प्रश्न विचरण्यात आला. यावर तिनं उत्तर देत म्हटलं, “हो… पाहिला ना, झालं असं की… चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिले २–३ दिवस मी तो पाहू शकले नाही. पण नुकताच मी हा चित्रपट पाहिला आणि चित्रपटाच्या टीमला मेसेजही केला. त्यावर त्यांनीही मला धन्यवाद असं उत्तर दिलं.”

दरम्यान, रश्मिका सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता विजय देवरकोंडाबरोबर साखरपुडा झाल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून पाहायला मिळत आहेत. यावर दोघांनीही अधिकृत वक्तव्य केलं नाही, पण विजयच्या टीमने हे कबूल केलं आहे की, दोघं फेब्रुवारी २०२६ मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.

रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम पोस्ट

रश्मिकाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती लवकरच ‘थम्मा’ या चित्रपटात झळकणार आहे. या रोमँटिक हॉरर-कॉमेडी चित्रपटात तिच्यासह अभिनेता आयुष्मान खुरानाही मुख्य भूमिकेत आहे. आदित्य सरपोतदारनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून यात नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, सत्यराज आणि फैसल मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.