Raveena Tandon Air India Flight Post : १२ जून रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे अवघा देश हादरला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत २७४ जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे देशात सर्वत्र शोकाकूल वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांनी या घटनेबद्दल दु:ख आणि शोक व्यक्त केला आहे. तसंच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजलीही वाहिली आहे.

या विमान अपघातामुळे एअर इंडिया या विमान कंपनीबद्दल काही जणांमध्ये अविश्वास पाहायला मिळत आहे. अशातच बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला. या प्रवासाबद्दलची पोस्टही तिने शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिने एअर इंडिया या विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिने “हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे. यानंतर खंबीर होण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळावी” असं म्हटलं होतं.

अभिनेत्रीने विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवल्याबद्दल आणि त्यांना धीर दिल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुक केलं; पण काहींनी मात्र तिच्या या कृतीमागील हेतूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रेडिटवर अनेकांनी रवीनाची ही पोस्ट ‘प्रमोशनल’ असल्याचं म्हटलं आहे. याबद्दल एकाने असं म्हटलं की, “देव न करो, पण जर तिच्या कुटुंबातील कोणी त्या विमानात असतं तर तिने अशी पोस्ट कधीच केली नसती.”

रवीना टंडने एअर इंडियाच्या विमानामधून प्रवास केल्याची पोस्ट

तर आणखी एकाने “लोक वास्तवापासून इतके दूर कसे राहू शकतात. लोकांची घर उद्ध्वस्त झाली आहेत आणि तुम्हाला कसली शक्ती हवी आहे?” तसंच “हे सेलिब्रिटी पैशांसाठी काहीही करतील, त्यांच्याकडून कधीच कोणती अपेक्षा करू नका”, “हे लोक वास्तवापासून खरंच दूर आहेत. कदाचित तिच्या पतीकडे एअर इंडियाचे शेअर्स वगैरे असतील”, असं म्हणत टीका केली आहे.

या टीकांबरोबरच काहींनी अभिनेत्रीच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. याबद्दल एकाने असं म्हटलं आहे, “तिने शेअर केलेल्या पोस्टमधून असं वाटतं की, ती या विमानांमधून नियमितपणे प्रवास करणाऱ्या क्रू आणि प्रवाशांना प्रेरित करत आहे. क्रू आणि प्रवाशांमध्ये सध्या भीती आहे, त्यामुळे तिने त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणून ही पोस्ट केली आहे, त्यामुळे यात काहीही चुकीचं नाही.”

रेडिट पोस्ट स्क्रीनशॉट

दरम्यान, १२ जून रोजी अहमदाबादच्या मेघानी नगर परिसराजवळ ही भयंकर विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एअर इंडियाचे बोईंग विमान टेक-ऑफनंतर काहीच सेकंदात खाली कोसळलं. या विमानात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. त्यांच्यापैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे. या अपघातानंतर टाटा समूहाकडून मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे.