Rekha Was Not Invited To Jaya And Amitabh Bachchan’s Wedding : रेखा, जया बच्चन व अमिताभ बच्चन हे त्रिकूट ९० च्या काळात बॉलीवूडमध्ये अनेकदा चर्चेचा विषय ठरायचं. रेखा व अमिताभ यांची प्रेमकहाणी त्या काळी प्रचंड गाजली. परंतु, अमिताभ व जया यांच्या लग्नानंतर अनेकदा रेखा व अमिताभ यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोललं गेलं. आजही या त्रिकुटाबद्दल अनेकदा वेगवेळ्या चर्चा होत असतात. एकदा तर रेखा जया बच्चनवर रागवल्या होत्या.
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार रेखा व जया या दोघी एकेकाळी जवळच्या मैत्रिणी होत्या. त्यांच्यामध्ये दोन बहिणींसारखं नातं निर्माण झालेलं, तर रेखा त्या काळी जया राहत असलेल्या इमारतीत राहत होत्या. त्यावेळी दोघींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होत असे. परंतु, एकदा रेखा यांनी जया यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
यासर उस्मान यांनी त्यांच्या ‘रेखा’ या पुस्तकात लिहिल्यानुसार, ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर अमिताभ बच्चनने जया बच्चनसह लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी अमिताभ यांचे काही चित्रपट फ्लॉप ठरले होते. तेव्हा रेखा जया यांची जवळची मैत्रीण असतानाही त्यांना जया व अमिताभ यांच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं नव्हतं.
जया व अमिताभ यांनी ३ ऑक्टोबर १९७३ रोजी लग्न केलं होतं. त्यावेळी रेखा यांना या लग्नाचं आमंत्रण मिळालं नसल्यानं त्यांना वाईट वाटलं होतं. एका मुलाखतीमध्ये रेखा यांनी जया बच्चन यांच्याबद्दल म्हटलं होतं, “एक वेळ अशी होती की, जेव्हा जया मला बहिणीप्रमाणे होती. मला ती खूप खरी वाटायची. कारण- ती मला अनेकदा चांगले सल्ले देत असत”.
रेखा पुढे जया यांच्याबद्दल म्हणाल्या, “नंतर मला जाणवलं की, ती सगळ्यांनाच असे सल्ले देत असते. तिला फक्त लोकांवर वर्चस्व गाजवायचं असतं”. रेखा एवढं बोलून थांबल्या नाहीत, तर लग्नाला न बोलावल्यानं त्या नाराजी व्यक्त करत म्हणाल्या, “इतकी जवळची मैत्रीण आणि एकाच इमारतीत राहत असतानाही मला तिच्या लग्नाला बोलावण्याची तसदीही घेतली नाही”.
दरम्यान, १९८१ रोजी रेखा, अमिताभ व जया यांनी एका चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटासाठी या तिघांची निवड केली होती.