अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलंय, अशा चर्चा होत आहेत. हंसिका व तिचा पती सोहेल खातुरिया यांच्या वैवाहिक समस्या सुरू आहेत, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये लग्न करणारे हे जोडपे सध्या एकाच घरात राहत नसल्याची माहिती समोर आली आहे.
हंसिका सध्या तिच्या आईबरोबर राहत आहे, तर सोहेल त्याच्या आई-वडिलांबरोबर राहतोय. लग्नानंतर अडीच वर्षातच या दोघांच्या नात्यात समस्या असल्याच्या बातम्या येत आहेत.
लग्नानंतर, हंसिका आणि सोहेल यांनी सुरुवातीला त्याच्या कुटुंबाबरोबर राहायचं ठरवलं. पण दोघांनाही कुटुंबाबरोबर जुळवून घेता आलं नाही, त्यामुळे त्यांना आव्हानांचा सामना करावा लागला. नंतर ते सोहेलचे आई-वडील राहतात त्याच इमारतीतील एका वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले होते. हंसिकाने गृहप्रवेशाचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र, वेगळे राहूनही दोघांच्या नात्यातील समस्या कमी झाल्या नाहीत, त्यामुळे आता ते वेगळे राहत आहेत, असं म्हटलं जात आहे.
सोहेल खातुरियाची प्रतिक्रिया
सोहेल खतुरिया त्याच्या व हंसिकाच्या नात्यांबद्दल सुरू असलेल्या अफवांबद्दल हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाला, “हे खरं नाही.” पण त्याने ते वेगळे राहतात की नाही याबद्दल बोलणं टाळलं.
सोहेल खातुरियाचे पहिले लग्न
सोहेल खातुरियाचे पहिले लग्न २०१४ मध्ये रिंकी बजाज हिच्याशी झाले होते. रिंकी व हंसिका या दोघाही चांगल्या मैत्रिणी होत्या. रिंकी व सोहेलच्या लग्नाला हंसिकाने हजेरी लावली होती. पण रिंकी व सोहेलचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यांचा घटस्फोट झाला. जवळच्या मैत्रिणीच्या एक्स पतीशी लग्न करत असल्याने हंसिकाला खूप ट्रोल केलं गेलं होतं.
“माझं आधी लग्न झालं होतं अशी बातमी समोर आली आणि ती चुकीच्या पद्धतीने आली. हंसिकामुळेच माझं ब्रेकअप झालं, लग्न मोडलं, अशा पद्धतीने ते मांडलं जात होतं. खरं तर ते पूर्णपणे असत्य आणि निराधार आहे,” असं स्पष्टीकरण सोहेलने दिलं होतं.
कोण आहे सोहेल खातुरिया?
सोहेल हा मुंबईचा असून तो उद्योजक आहे. हंसिका व सोहेल खातुरिया लग्न करण्यापूर्वी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ते चांगले मित्र होते. तसेच ते दोघेही बिझनेस पार्टनर होते. त्यांनी एकमेकांबरोबर अनेक इव्हेंट केले होते. दोघेही एकत्र काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. सोहेलने पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केलं होतं. अगदी चित्रपटातल्या सीनप्रमाणे सोहलने रोमँटिक अंदाजात तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघांनी डिसेंबर २०२२ मध्ये राजस्थानमध्ये शाही सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती.