ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा २’ चित्रपटच्या सेटवर बुधवार, ७ मे रोजी अपघात झाल्याचे वृत्त समोर आले होते. इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील एमएफ कपिल नावाच्या ज्युनिअर आर्टिस्टची कोल्लूरमधील सौपर्णीका नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. जेवणाच्या सुट्टीनंतर तो नदीत पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे वृत्त मिळाले होते. नंतर स्थानिक अग्निशमन विभागासह त्याचं तात्काळ शोध घेतला आणि बचाव कार्य सुरू केले.

मग संध्याकाळी कपिलचा मृतदेह नदीत सापडला. अशातच आता निर्मात्यांनी या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे की, त्या ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू सेटवर झाला नाही. तो त्याच्या वैयक्तिक कामासाठी आलेला होता. गुरुवार, ८ मे रोजी होम्बाले फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसने त्याच्या मृत्यूबद्दल एक निवेदन जारी केले आणि या निवेदनातून त्यांनी ही माहिती दिली.

“या निवेदनातून त्यांनी ज्युनिअर आर्टिस्ट एमएफ कपिलचा मृत्यू चित्रपटाच्या सेटवर झाल्याच्या वृत्ताबद्दल स्पष्टीकरण देत असं म्हटलं की, “ज्युनिअर आर्टिस्ट एमएफ कपिलच्या अकाली निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात आम्ही त्याच्या कुटुंबियांना आणि त्याच्या प्रियजनांना मनापासून संवेदना व्यक्त करतो.”

यानंतर असं म्हटलं आहे की, “आम्ही आदरपूर्वक स्पष्ट करू इच्छितो की, ही घटना ‘कांतारा’ चित्रपटाच्या सेटवर घडली नाही. त्या दिवशी कोणतेच शूटिंग झाले नाही आणि ही दुर्दैवी घटना कदाचित दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमादरम्यान घडली असावी ज्याचा चित्रपटाशी काहीही संबंध नाही. या घटनेचा चित्रपटाशी किंवा त्याच्या टीमशी संबंध जोडणाऱ्या सर्वांना आम्ही मनापासून विनंती करतो की, चुकीची माहिती पसरवू नये.”

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने ज्युनिअर आर्टिस्ट कपिलच्या मृत्यूच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली. याबद्दल (AICWA) ने एक निवेदन जारी करत म्हटलं की, “जेव्हा एखादा कामगार चित्रपटाच्या सेटवर आपला जीव गमावतो, तेव्हा त्याचे खरे कारण लपवले जाते आणि सत्य उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इतर कामगाराला धोका निर्माण होतो. ही प्रथा बंद झाली पाहिजे.”

दरम्यान, ‘कांतारा २’बद्दल सांगायचे झाल्यास या चित्रपटाचे लिखाण आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टीनेच केले होते. ‘कांतारा: चॅप्टर १ ए लीजेंड’ हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.